भावोजीचे अपहरण करुन खंडणी वसुलीचा प्रकार उघड
अपहरणासह खंडणीच्या गुन्ह्यांत मेहुण्यासह तीन सहकार्यांना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 नोव्हेंबर 2025
मुंबई, – गॅस सिलेंडरचा काळाबाजार करत असल्याची टिप आपल्या तीन सहकार्यांना देऊन स्वतच्याच भावोजीचे मेहुण्याने अपहरण करुन त्यांच्याकडून खंडणी वसुली केल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरी परसिरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अपहरणासह खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आरोपी मेहुण्यासह त्याच्या तिन्ही सहकार्यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. रेहान शकील शेख, रुपेश महेंद्र यादव, आमीर आयुब मिर्झा आणि संदीप लेखाराम बिष्पोई अशी या चौघांची नावे आहेत. यातील संदीप हा तक्रारदाराचा मेहुणा असून गॅस सिलेंडरचा काळाबाजार करत असल्याचे सांगून त्यांना धमकावून खंडणी वसुली करण्यास सांगितले होते. या संपूर्ण कटाचा तोच मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर या चौघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
35 वर्षांचे तक्रारदार हडमानराम बगडूराम बिष्णोई हे अंधैरीतील मरोळ-मरोशी रोड, आदर्शनगर परिसरात राहतात. सध्या ते अंधेरीतील अंजली गॅस सर्व्हिसमध्ये डिलीव्हरी पिकअप गाडीवर चालक व डिलीव्हरी बॉय म्हणून कामाला आहे. 26 ऑगस्टला सायंकाळी चार वाजता ते नेहमीप्रमाणे त्यांच्या पिकअप गाडीवर गॅस सिलेंडर डिलीव्हरीसाठी गेले होते. उत्तम ढाबा परिसरात गॅस सिलेंडर काढत असताना एका कारमधून तीनजण आले. त्यांनी त्यांना गॅस सिलेंडरची चोरी करत असल्याचा आरोप करुन त्यांचे अपहरण केले. त्यांना आरे कॉलनीतील पिकनिक पॉईटजवळ आणले.
तिथेच त्यांना या तिघांनी गॅस सिलेंडरचा काळाबाजार करत असल्याचे सांगून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यांच्या मोबाईलवरुन 83 हजार आणि खिशातील बारा हजार रुपये घेतले होते. त्यानंतर त्यांना त्यांच्या मित्राकडून आणखीन 50 हजार रुपये मागण्यास सांगितले. काही वेळानंतर त्यांच्या मित्राने त्यांना 50 हजार रुपये पाठविले. ही रक्कम ऑनलाईन ट्रान्स्फर करुन घेतल्यानंतर ते तिघेही पळून गेले. यावेळी या तिघांनी त्यांना पोलिसांत तक्रार केली तर जिवे मारण्याची धमकी दिली होती. जिवाच्या भीतीने त्यांनी हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता.
31 ऑक्टोंबरला ते होली फॅमिली स्कूलजवळ गॅस सिलेंडरसाठी गेले होते. यावेळी त्यांचे त्याच तिघांनी पुन्हा अपहरण केले. त्यांना आरे कॉलनी रोड, फिल्टरपाडा, तीन बिल्डींगजवळ आणून त्यांच्याकडे दोन लाखांची मागणी केली होती. यावेळी त्यांनी त्यांच्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. त्यानंतर ते तिघेही त्यांच्याकडील तेराशे रुपये घेऊन तेथून पळून गेले होते. हा प्रकार त्यांनी त्यांचा चुलत भाऊ सागर बिष्णोई याला सांगितला. त्याने त्यांना पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र वाणी यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला. या तक्रारीची वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र वाणी यांनी गंभीर दखल घेत त्याच्या पथकाला तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर पोलीस उपनिरीक्षक आनंदराव काशिद यांनी हडमानराम बिष्णोई यांच्या तक्रारीवरुन संबंधित आरोपीविरुद्ध अपहरणासह खंडणीसाठी धमकी देऊन खंडणी वसुल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र वाणी, पोलीस निरीक्षक महेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंदराव काशिद, पोलीस हवालदार गौतम बडे, पोलीस शिपाई तुषार जाधव, दिनेश लोखंडे, अशोक अवघडे, बिाल सिंगने आणि प्रकाश शिंदे यांनी तपास सुरु केला होता. सीसीटिव्ही फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी रेहान शेख, रुपेश यादव आणि आमीर मिर्झा या तिघांना अटक केली.
त्यांच्या चौकशीत हा संपूर्ण कट संदीप बिष्णोई याने रचल्याचे उघडकीस आले. संदीप हा तक्रारदाराचा मेहुणा आहे. ते गॅस सिलेंडरचा काळाबाजार करतात, त्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत, त्यांचे अपहरण करुन त्यांच्याकडे खंडणीची मागणी करा असे त्याने इतर तिघांना सांगितले होते. त्यामुळे ऑगस्ट महिन्यांत या तिघांनी हडमानराम यांचे अपहरण केले होते. त्यांना खंडणीसाठी धमकावून त्यांच्याकडून 1 लाख 46 हजार रुपये घेतले होते.
पहिला प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर त्यांनी तीन दिवसांपूर्वी त्यांचे पुन्हा अपहरण करुन त्यांच्याकडे दोन लाखांची मागणी केली होती. मात्र तक्रारदारांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. तपासात आलेल्या या माहितीनंतर संदीप बिष्णोईला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर चारही आरोपींना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची चौकशी सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र वाणी यांनी सांगितले.