42 कोटीच्या हायड्रोपोनिक गांजासह दोन प्रवाशांना अटक
गेल्या दोन दिवसांत 90 कोटीचे गांजा-कोकेनचा साठा जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 नोव्हेंबर 2025
मुंबई, – रविवारी बँकाँकहून आणलेल्या दोन प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकार्यांनी अटक केली. या दोन्ही प्रवाशांकडून या अधिकार्यांनी खाद्य पॅकेटमधून आणलेला 42 किलो 340 ग्रॅम वजनाचा हायड्रोनिक गांजाचा साठा जप्त केला असून आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 42 कोटी 34 लाख रुपये आहे. या दोघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. यापूर्वी या अधिकार्यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 47 कोटीचे कोकेन जप्त केले होते, याच गुन्ह्यांत आता पाचजणांना अटक करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांत या अधिकार्यांनी 90 कोटीचे गांजा आणि कोकेनचा साठा जप्त केला आहे.
रविवारी बॅकाँकहून येणार्या विमानातून काही प्रवाशी हायड्रोपोनिक गांजाची तस्करी करणार असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर बँकाँकहून येणार्या प्रत्येक संशयित प्रवाशांसह त्यांच्या सामानाची या अधिकार्यांनी कसून तपासणी केली होती. याच दरम्यान संशयास्पदरीत्या फिरणार्या दोन प्रवाशांना या अधिकार्यांनी ताब्यात घेतले होते. त्यांच्या सामानाची झडती घेतल्यानंतर त्यात या अधिकार्यांना 21 खाद्य पॅकेट सापडले. त्यात नूडल्स, बिस्कीटासह इतर पॅकेटचा समावेश होता.
या खाद्यपदार्थांमध्ये लपवून हायड्रपोनिक गांजाचा साठा जप्त केला आहे. जप्त केलेला 42 किलो 340 ग्रॅम वजनाचा असून त्याची किंमत 42 कोटी 34 लाख रुपये इतकी आहे. या दोन्ही प्रवाशांना नंतर या अधिकार्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत नंतर दोघांनाही या अधिकार्यांनी अटक केली.
31 ऑक्टोंबरला याच अधिकार्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 47 कोटी 70 लाख रुपयांचा कोकेनचा साठा जप्त केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पाचजणांना या अधिकार्यांनी अटक केली. त्यात वाहक, वित्तपुरवठादार, हाताळणारे आणि वितरक आदींचा समावेश आहे. गेल्या तीन दिवसांत डीआरआयच्या अधिकार्यांनी वेगवेगळ्या कारवाईत 90 कोटीचा ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. या ड्रग्ज तस्करांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघडकीस आले असून त्याचा पुढील तपास सुरु आहे.