कोंडून ठेवल्यानंतर माहेरी पळून गेलेल्या पत्नीसह कुटुंबियांवर हल्ला

तलवारीसह अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी देऊन चार तास मुर्गा बनविले

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
31 मे 2026
मुंबई, – कौटुंबिक वादातून बेदम मारहाण करुन पत्नीला पतीने घरात कोंडून ठेवले, मात्र पतीला झोप लागलाच पत्नी पळून माहेरी गेली, त्याचा राग अनावर झाल्याने आरोपी पतीने पत्नीसह सासरे, मेहुणा आणि त्याच्या पत्नीला बेदम मारहाण करुन चाकूने हल्ला केल्याची घटना चेंबूर परिसरात घडली. या हल्ल्यात इशरतजहाँ अरबाज सय्यद ही 25 वर्षांची महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर गोवंडीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले आहे. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी पती अरबाज अन्वरअली सय्यद याला आरसीएफ पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. घरात कोंडून ठेवण्यापूर्वी त्याने इशरतजहाँला भरस्त्यात लाथ्याबुक्यांनी मारहाण करताना तलवारीसह अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी देऊन चार तास मुर्गा बनविल्याचे उघडकीस आले आहे. या संपूर्ण घटनेने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

ही घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजता चेंबूर येथील वाशीनाका, डॉ. झिनत क्लिनिकजवळील पटेलनगर, फारुख गल्लीत घडली. याच परिसरात इशरतजहाँ ही तिचा पती अरबाज आणि पतीच्या पहिल्या पत्नीचा मुलगा मारुफसोबत राहते. अरबाज हा काहीच कामधंदा करत नसून त्याला दारुसह गांजा पिण्याचे व्यसन आहे. तिचे आई-वडिल तिच्या शेजारी राहत असून तिचे कुटुंबिय तिच्या संपूर्ण कुटुंबियांचा खर्च करते. अरबाज हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अठराहून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या वाढत्या गुन्ह्यांची पोलिसांनी गंभीर दखल घेत त्याच्याविरुद्ध डिसेंबर 2025 रोजी एक वर्षांसाठी तडीपारची कारवाई केली होती. क्षुल्लक कौटुंबिक कारणावरुन त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते.

शुक्रवारी 28 मेला दुपारी दोन वाजता तो तिला जिन्स पॅण्ट आणि अत्तराची बॉटल घेण्यासाठी विजयनगर, जामा मशिदीजवळ घेऊन गेला होता. तिथे गेल्यानंतर त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला आणि त्याने तिला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली. हातासह लाथ्याबुक्यांनी तसेच पट्ट्याने केलेल्या मारहाणीत इशरतजहाँला गंभीर दुखापत झाली होती. तसेच तिला तलवारीने जिवे मारण्याची तसेच अ‍ॅसिड हल्ल्याची धमकी देऊन चार तास मुर्गा बनविले होते. घरी आल्यानंतर त्याने तिला कोंडून ठेवले. त्यानंतर तो घरीच झोपला होता. ही संधी साधून ती तिच्या आई-वडिलांकडे पळून गेली होती.

झोपेतून उठल्यानंतर त्याला इशरतजहाँ दिसली नाही. त्यामुळे त्याचा राग अनावर झाला आणि तो तिच्या माहेरी आली. तिथे तिला पाहिल्यानंतर त्याने तिला पुन्हा शिवीगाळ करुन बेदम लाथ्याबुक्यांनी मारहाण केली. तसेच तिचे वडिल हैदअली आणि भाऊ मोहम्मद अहमद यांनाही मारहाण केली. तिची वहिनी नूरशिफा हिने त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिच्या पोटात जोरात लाथ मारली. त्यानंतर काही कळण्यापूर्वीच त्याने तिक्ष्ण हत्याराने इशरतजहाँवर चाकूने वार केले होते. त्यात तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. जिवाच्या भीतीने ती घराबाहेर पडून पळू लागली. तिने मदतीसाठी शंभर क्रमांकावर कॉल केला.

काही वेळानंतर तिथे पोलीस आले. त्यानंतर तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगून तिच्या पतीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अरबाजविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. याच गुन्ह्यांत त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या इशरतजहॉवर गोवंडीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले असून प्राथमिक औषधोपचारानंतर तिला घरी पाठविण्यात आले आहे. शुक्रवारी घडलेल्या या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page