दूधासाठी रडणार्या मुलाची फरशीसह जमिनीवर आपटून हत्या
हत्येच्या गुन्ह्यांत आरोपी पित्याला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
31 मे 2026
मुंबई, – दूधासाठी रडणार्या चार वर्षांच्या शारीरिक विकलांग असलेल्या अल्पवयीन मुलाची त्याच्या पित्याने रागाच्या भरात फरशीसह जमिनीवर आपटून हत्या केल्याची धक्कादायक घटना पवई परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच आरोपी पिता राजेश प्रकाश सिंग याला पवई पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. राजेश हा काहीच कामधंदा करत नसून त्याला दारुसह नशा करण्याचे व्यसन आहे. याच नशेतून त्याने मुलाची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
ही घटना शुक्रवारी सकाळी पाच वाजता पवईतील मोरारजीनगर, गौतमनगर परिसरात घडली. याच परिसरात लिला प्रकाश सिंग ही महिला तिच्या कुटुंबियांसोबत राहत असून ती तिच्या पतीसोबत भाजी विक्रीचा व्यवसाय करते. याच परिसरात तिचा लहान भाऊ राजेश सिंग हा त्याची पत्नी आशा आणि चार वर्षांचा मुलगा यश यांच्यासोबत राहते. यश हा शारीरिक विकलांग असून सतत आजारी असतो. त्यामुळे त्याच्यावर कूपर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. राजेश हा काहीच कामधंदा करत नसून त्याला दारुसह नशा करण्याचे व्यसन होते. याच कारणावरुन राजेश आणि आशा यांच्यात सतत खटके उडत होते.
पतीसोबत होणार्या नेहमीच्या भांडणाला कंटाळून ती एक आठवड्यापूर्वीच घर सोडून निघून गेली होती. त्यामुळे लिला ही त्याला जेवण आणि इतर साहित्य पुरवते. शुक्रवारी 29 मेला सकाळी साडेपाच वाजता राजेश हा तिच्या घरी आला होता. त्याने यशचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यामुळे ती राजेशच्या घरी गेली होती. तिथे गेल्यानंतर तिला यशची काहीच हालचाल दिसून आली नाही. त्याच्या डोक्याला सूज होती, डोक्याच्या उजव्या बाजूला रक्त येत होते. याबाबबत तिने राजेशकडे विचारणा केली असता त्याने यश हा दूधासाठी सतत रडत होता. त्यामुळे त्याने रागाच्या भरात त्याचे डोके दरवाजा आणि फरशीवर आपटले.
या घटनेनंतर तिने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला कॉल करुन ही माहिती सांगितली. या माहितीनंतर पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यशला पोलिसांनी तातडीने जवळच्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याचा मृतदेह नंतर शवविच्छदेनासाठी पाठविला होता. त्याचा अहवाल नंतर पोलिसांना प्राप्त झाला होता. त्यात यशच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली होती, त्याची कवटी फ्रॅक्चर झाल्याने अंतर्गत रक्तस्त्राव झाला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला होता.
या अहवालानंतर राजेशने दूधासाठी रडणार्या स्वतच्या चार वर्षांच्या मुलाचे डोके फरशीसह जमिनीवर आपटून हत्या केल्याचे उघडकीस आले होते. या घटनेनंतर लिला सिंग हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिचा भाऊ राजेश सिंग याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला सोमवार 1 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शुक्रवारी उघडकीस आलेल्या या हत्येच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.