चुकीची नोंद करुन सचिन तेंडुलकर जिमखान्याची आर्थिक फसवणुक

24 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी वॉण्टेड कॅशिअरला अटक

0

अरुण सावरटकर
31 मे 2026
मुंबई, – चुकीची नोंद करुन कांदिवलीतील महावीरनगर परिसरात असलेल्या मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या सचिन तेंडुलकर जिमखानाची (क्लब) सुमारे 24 लाखांची आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी तेजराम अशोक पेडेकर या आरोपी कॅशिअरला कांदिवली पोलिसांनी अटक केली. अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच तेजराम हा पळून गेला होता. अखेर त्याला सव्वावर्षांनंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

जितेंद्र सत्यदेव वर्मा हे नालासोपारा येथील म्हाडा कॉलनीत राहतात. गेल्या दहा वर्षांपासून ते शिर्के रिक्रेशन इंटरप्रायजेस या कंपनीत सिनिअर अकाऊंट आणि फायनान्स मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांच्या कंपनीकडे कांदिवलीतील महावीर नगर परिसरातील मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या सचिन तेंडुलकर जिमखानाचे (क्लब) सर्व व्यवस्थापन पाहण्याचा एक करार झाला होता. त्यात क्लबचे स्पोर्ट अ‍ॅक्टिविटी, जिम स्विमिंग पुल, बॅक्वेट हॉल, तीन रेस्ट्रॉरंट आणि दोन बारचे सर्व व्यवस्थापन आणि आर्थिक व्यवहाराचा समावेश आहे. त्यासाठी कंपनीने क्लबच्या प्रत्येक सुविधांसाठी लागणारे मॅनेजर, इतर स्टाफ यांची नेमणूक कर्मा मॅनेजमेंट ग्लोबल कन्सलंटन्ट सोलुशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दिले होते. तसा त्यांच्याशी कंपनीने करार केला होता.

रेस्ट्रॉरंट आणि बारसाठी तेजराज पेडणेकरसह इतर पाचजणांची कॅशिअर म्हणून नेमणूक करण्यात आली होती. या पाचजणांवर क्लबमधील बार आणि रेस्ट्रॉरंटमध्ये कॅश, ऑनलाईन पेमेंट, डेबीट, क्रेडिट कार्डमधून झालेले बिल पंच करण्याचे काम होते. त्यासाठी प्रत्येक कॅशिअरला स्वतंत्र आयडी देण्यात आले होते. ही बिले संजय पवार यांच्याकडून महिन्यांच्या शेवटची ती बिल जितेंद्र वर्मा यांच्याकडे तपासणीसाठी येत होती. अनेकदा तिथे येणारे ग्राहक भारत पे पोर्टलद्वारे पेमेंट करत होते. ही रक्कम दुसर्‍या दिवशी शिर्के रिक्रेशन कंपनीच्या बँक खात्यात जमा होत होती. मे ते डिसेंबर 2024 या कालावधीत अकाऊंटची तपासणी करताना जितेंद्र वर्मा यांना 24 लाख 10 हजार 817 रुपयांच्या हिशोबात प्रचंड तफावत दिसून आली होती.

हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याची शहानिशा करण्यात आली होती. त्यात सॉफ्टवेअरमध्ये नोंद केलेल्या बिलाची इंट्रीमध्ये जास्त बिल दाखविले जात होते, मात्र कंपनीसह विझा मास्तरच्या स्टेटमेंटमध्ये रक्कमेचा फरक दिसत होता. ग्राहकांनी कॅश स्वरुपात दिलेले पेमेंट तेजरात पेडणेकर आणि कुशल सोलंकी यांनी भारत पे आणि विसा मास्टर यांचे क्रमांक दाखवून ग्राहकांनी अदा केलेली रक्कम स्वतच्या फायद्यासाठी वापरली होती. त्यामुळे बार आणि रेस्ट्रॉरंटमधील पाचही कॅशिअरकडे त्यांच्या पैशांचा अहवाल मागण्यात आला होता. मात्र त्यांनी अहवाल देण्यास नकार दिला. याच प्रकरणात तेजराज आणि कुशल यांची चौकशी करण्यात आली होती. त्यात त्यांनी लॉगिंन आयडीचा वापर करुन चुकीची नोंद करुन 24 लाख 10 हजार 817 रुपयांचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर केल्याचे सांगितले.

ही माहिती नंतर कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना देण्यात आली होती. त्यामुळे कंपनीने जितेंद्र वर्मा यांना संबंधित कॅशिअरविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर त्यांनी फेब्रुवारी 2025 रोजी तेजराज पेडणेकर याच्याविरुद्ध तक्रार केली हेती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी चुकीची नोंद करुन क्लबच्या पैशांचा परस्पर अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तेजरात हा पळून गेला होता. गेल्या सव्वावर्षांपासून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असातानाच गेल्या आठवड्यात त्याला पोलिसांनी अटक केली. पोलीस कोठडीनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page