चार हजाराची लाच घेताना आरटीओच्या कनिष्ठ लिपीकाला अटक
दंडाची रक्कम कमी करण्यासाठी लाचेची मागणी करणे महागात पडली
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 जून 2026
मुंबई, – बसवरील दंडाची रक्कम कमी करण्यासाठी लाचेची मागणी करणे बोरिवलीतील प्रादेशिक परिवहन विभागाच्या एका कनिष्ठ अधिकार्याला चांगलेच महागात पडले. दंडाची रक्कम कमी करण्यासाठी पाच हजाराची लाचेची मागणी करुन चार हजार रुपयांची लाचेची रक्म घेताना कनिष्ठ लिपीक मिथुन विलास आडे याला सोमवारी मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. सोमवारी झालेल्या या कारवाईने तिथे उपस्थित अधिकारी आणि कर्मचार्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
यातील तक्रारदाराच्या मालकीची एक खाजगी बस आहे. काही दिवसांपूर्वी बोरिवलीतील प्रादेशिक परिवहन विभागाने त्यांच्या बसवर 26 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावला होता. दंडाची रक्कम कमी व्हावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. याबाबत बोलणी करण्यासाठी ते संबंधित कार्यालयात आले होते. तिथेच त्यांची भेट कनिष्ठ लिपीक मिथुन आडेशी झाली होती. त्यांच्याशी सविस्तर चर्चा करुन त्यांनी बसवरील दंडाची रक्कम कमी करण्याची विनंती केली होती. ही रक्कम कमी करण्यासाठी त्याने त्यांच्याकडे पाच हजाराची मागणी केली होती. ही लाच दिल्याशिवाय दंडाची रक्कम होणार नाही तसेच बसवर कारवाई केली जाईल असे सांगितले होते. त्यामुळे इच्छा नसतानाही त्यांनी त्याला पाच हजार रुपयाची लाच देण्याची तयारी दर्शविली होती.
या प्रकारानंतर सोमवारी 1 जूनला त्यांनी मिथुन आडेविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची लागलीच शहानिशा करण्यात आली होती. त्यात मिथुन आडेने तक्रारदाराच्या बसवरील दंडाची रक्कम कमी करण्यासाठी पाच हजाराच्या लाचेची मागणी करुन चार हजार रुपये स्विकारण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर या पथकाने संबंधित विभागात सापळा लावला होता. यावेळी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम घेताना मिथुन आडे यांना या अधिकार्यांनी रंगेहाथ पकडले होते. त्यांच्याविरुद्ध भष्ट्राचार प्रतिबंधक् अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक निता भोसले यांनी केल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजीत सुळे यांनी सांगितले.