मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
31 मे 2026
मुंबई, – मालाडच्या मालवणीत परिसरात राहणार्या पत्नीची तिक्ष्ण हत्याराने वार करुन पळून गेलेल्या आरोपी पतीला एक आठवड्यानंतर अटक करण्यात मालवणी पोलिसांना यश आले आहे. मोहम्मद शमशुद्दीन अब्दुल मतीन असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर त्याची पत्नी सेलिमा खातून या 33 वर्षांच्या पत्नीची हत्या करुन तिचा मृतदेह घरात ठेवून पलायन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. कौटुंबिक वादातून ही हत्या झाल्याचे उघडकीस आले होते, मात्र हत्येमागे अन्य काही कारण आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
ही घटना 18 मे रात्री बारा ते 22 मे 2026 रोजी रात्री बारा या कालावधीत मालाडच्या मालवणी, गेट क्रमांक सात, एनसीसी, प्लॉट क्रमांक पाचमध्ये घडली. याच परिसरातील फ्लॅट क्रमांक 58 मध्ये मोहम्मद शमशुद्दीन हा त्याची पत्नी सेलिमासोबत राहत होती. सेलिमा ही मूळची कोलकाता तर शमशुद्दीन हा ओरिसाचा रहिवाशी आहे. तो तिच्यापासून तीन वर्षांनी लहान होता. त्यांचा प्रेमविवाह झाला होता. 18 मेला सेलिमाला स्थानिक रहिवाशांनी शेवटचे पाहिले नाही. त्यानंतर तिचा घराचा दरवाजा बंदच होता.
22 मेला तिच्या घरातून दुर्गंधी येत होती, त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी शमशुद्दीनला कॉल करुन ही माहिती दिली. यावेळी त्याने उंदीर मेल्याचे सांगून त्याकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले. मात्र प्रचंड दुर्गधी असल्याने त्यांना संशय निर्माण झाला. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी ही माहिती मालवणी पोलिसांना दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता आतमध्ये सेलिमाचा मृतदेह सापडला. तिची तिक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या करण्यात आली होती. तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. पंचनामा केल्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
तिची लहान बहिण हलीमा खातून अरफअली मौला ही कोलकाता येथील परगाना, नॉर्थच्या कुमारजोल परिसरात राहत असल्याने तिला ही माहिती देण्यात आली होती. मुंबईत आल्यानतर तिच्या तक्रारीवरुन मोहम्मद शमशुद्दीन याच्याविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक रहिवाशांनी त्याला कॉल केल्यानंतर त्याने त्याचा मोबाईल बंद केला होता. हत्येनंतर तो ओरिसा येथे पळून गेल्याचा संशय असल्याने त्याच्या अटकेसाठी एक टिम तिथे पाठविण्यात आली होती.
त्याचा शोध सुरु असताना त्याला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठ मुंबईत आणण्यात आले. चौकशीत त्यानेच सेलिमा खातूनची हत्या केल्याची कबुली दिली आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.