मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत डिजीटल अरेस्टच्या नावाने 53 लाखांची फसवणुक

वयोवृद्ध व्यावसायिकाला गंडा घालणार्‍या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 नोव्हेंबर 2025
मुंबई, – मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत डिजीटल अरेस्टच्या नावाने एका वयोवृद्ध व्यावसायिकाची तीन अज्ञात सायबर ठगांनी सुमारे 53 लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार आग्रीपाडा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी राहुल सिन्हा, विजय खन्ना आणि एसएसपी समाधान पवार या तोतया पोलिसांसह ट्राय अधिकार्‍याविरुद्ध मध्य प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी फसवणुकीसह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फसवणुकीसाठी या तिघांनी कोर्टात जामिनासाठी ऑनलाईन सुनावणी घेऊन त्यांचा जामिन रद्द करुन सर्व बँक खात्यातील रक्कम सरकारी बँक खात्यात जमा करण्याचे आदेश दिल्याचे चित्र निर्माण केल्याचे उघडकीस आले आहे.

शहाब यासुब तुराबी हे 60 वर्षांचे वयोवृद्ध आग्रीपाडा परिसरात राहतात. त्यांचा दुबई येथे शिपिंग अ‍ॅण्ड लॉजिस्टिक क्लिरिंगचा व्यवसाय आहे. 3 नोव्हेंबरला ते त्यांच्या आग्रीपाड्यातील राहत्या घरी होते. यावेळी त्यांना राहुल सिन्हा नावाच्या एका व्यक्तीने कॉल करुन तो ट्रायमधून बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्या आधारकार्डवरुन काही सिमकार्ड घेण्यातआले असून या सिमकार्डवरुन अनेकांना चुकीचे आक्षेपार्ह आणि वादग्रस्त मॅसेज पाठविले जात आहेत. तुम्हाला दोन तासांत दिल्ली पोलिसांकडे चौकशीसाठी हजर राहावे लागेल असे सांगितले. यावेळी शहाब यांनी दिल्ली येथे येणे शक्य नसल्याचे सांगितले. यावेळी राहुलने त्यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी त्यांची चौकशी करतील असे सांगितले.

काही वेळानंतर त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल केला होता. त्याने त्याचे नाव विजय खन्ना असल्याचे सांगून तो दिल्ली पोलीस दलात काम करत असल्याचे सांगितले. त्याने नरेश गोयल या व्यक्तीविरुद्ध मनी लॉड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यांत दिल्लीतील दरियागंजच्या एका बँकेचा खात्याचा वापर झाला आहे. ते खाते त्यांच्या नावाने उघडण्यात आले होते. तुम्ही वयोवृद्ध असल्याने त्यांना तात्काळ अटक होणार नाही, मात्र चौकशीचा एक भाग म्हणून माझे वरिष्ठ अधिकारी त्यांच्याशी बोलतील असे सांगितले. त्यानंतर त्यांना एसएसपी असलेल्या समाधान पवार या व्यक्तीचा कॉल आला होता. त्याने त्यांना काही तपास यंत्रणेचे दस्तावेज पाठविले होते. त्यातील एका नोटीसमध्ये त्यांच्या व्यवसायासह इतर गुंतवणुक आणि प्रॉपटीची माहिती विचारण्यात आली होती.

ते दस्तावेज खरे असल्याचे समजून त्यांनी त्यांना सर्व माहिती सांगितली. यावेळी समाधान पवार याने त्यांना त्यांच्या राहत्या डिजीटल अरेस्ट केल्याचे सांगून उद्या कोर्टात त्यांची बेल हेअरिंग होईल असे सांगितले. त्यानंतर त्यांना व्हिडीओ कॉल करुन एका खोलीत थांबण्याचे आदेश दिले होते. त्या रुममध्ये ते एकटेच राहिले होते, तसेच त्यांनी त्यांचा कॉल सुरु ठेवला होता. दुसर्‍या दिवशी दिल्लीतील कोर्टात ऑनलाईन बेल हेअरिंग सुरु झाली होती. यावेळी कोर्टाने त्यांचा नरेश गोयल मनी लॉड्रिंग केसमध्ये सहभाग असल्याचे दिसून येत असल्याने त्यांचा जामिन अर्ज रद्द केल्याचे सांगितले. तसेच त्यांचे सर्व बँक खाते फ्रिज करण्याचे तसेच बँकेतील रक्कम सुरक्षेच्या कारणासाठी सरकारी बँक खात्यात जमा करण्याचे आदेश दिले होते.

काही वेळानंतर समाधान पवार यांनी त्यांचा जामिन रद्द झाल्याचे तसेच बँकेतील सर्व रक्कम सरकारी बँक खात्यात जमा करण्याबाबतचे आदेश पाठवून दिले होते. काही वेळानंतर त्यांनी त्यांना सर्व रक्कम ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले होते. भीतीपोटी त्यांनीही दोन वेगवेगळ्या बँक खात्यात 53 लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. ही रक्कम ट्रान्स्फर करुनही समाधान पवार त्यांच्याकडून आणखीन पैशांची मागणी करत होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्याने त्याची नजर चुकवून सोशल मिडीयावर समाधान पवार याच्याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना संबंधित व्यक्तीने पोलीस असल्याची बतावणी करुन, डिजीटल अरेस्टची धमकी देऊन अनेकांची आर्थिक फसवणुक केल्याचे दिसून आले.

त्यामुळे त्यांनी व्हिडीओ कॉल बंद करुन तातडीने 1930 आणि मध्य सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत राहुल सिन्हा, विजय खन्ना आणि एसएसपी समाधान पवार नाव सांगणार्‍या तोतया ट्राय आणि दिल्ली पोलिसांविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे. त्या बँक खात्यातील सर्व व्यवहार थांबविण्याची तसेच खातेदारांची माहिती काढण्याच्या कारवाईला सुरुवात केल्याचे पोलिसाीं सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page