विक्री केलेल्या फ्लॅटवर हेव्ही डिपॉझिटवर भाडेकरु ठेवून फसवणुक
चित्रकार महिलेच्या तक्रारीवरुन आरोपी फ्लॅटमालकाला अटक
अरुण सावरटकर
29 जानेवारी 2026
मुंबई, – विक्री केलेल्या फ्लॅटवर वीस लाख रुपयांच्या हेव्ही डिपॉझिटवर भाडेकरु ठेवून एका चित्रकार महिलेची फसवणुक केल्याप्रकरणी आरोपी फ्लॅटमालकाला मालाड पोलिसांनी अटक केली. साहेब जगन्नाथ सिंग असे या 49 वर्षीय आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्याची पत्नी मनप्रितकौर साहेब सिंग ही सहआरोपी असून तिच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार आहे. या दोघांवर फ्लॅट खरेदी-विक्रीच्या व्यवहारात 1 कोटी 82 लाख रुपयांचा अपहार करुन तक्रारदार महिलेची फसवणुक केल्याचा आरोप आहे.
रितू अनुज कर्नावत ही 53 वर्षांची महिला तिच्या पतीसह तीन मुलांसोबत अंधेरीतील सातबंगला परिसरात राहते. तिच्या पतीचा फायनान्स कन्सल्टंटीचा व्यवसाय असून ती स्वत चित्रकार आहे. त्यांचा फ्लॅट त्यांना अपुरा पडत असल्याने ते मोठ्या फ्लॅटच्या शोधात होते. याच दरम्यान त्यांचा मित्र जसदिपसिंग चास यांनी त्यांची साहेब सिंग आणि त्याची पत्नी मनप्रितकौरशी ओळख करुन दिली होती. ते दोघेही अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स, पर्ल अपार्टमेंटमध्ये राहत होते. त्यांनी त्यांचा मालाड येथील ऑर्लेम, डॉमिनिक कॉलनी, वर्धमान पम्पायर सहकारी सोसायटीच्या न्यू एम्पायर अपार्टमेंटच्या नवव्या मजल्यावर 904 क्रमांकाचा अन्य एक फ्लॅट असल्याचे सांगितले.
याच फ्लॅटची त्यांना विक्री करायची होती. त्यामुळे रितू तिच्या पतीसोबत फ्लॅट पाहण्यासाठी गेली होती. त्यांच्या कुटुंबियांसाठी तो फ्लॅट योग्य वाटल्याने त्यांनी तोच फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी सिंग पती-पत्नीने फ्लॅटची किंमत दोन कोटी चाळीस लाख रुपये सांगितले होते, मात्र ही रक्कम जास्त असल्याने तडजोडीनंतर त्यांच्यात फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहार पावणेदोन कोटी रुपयांमध्ये झाला होता. याच दरम्यान साहेब सिंगने त्यांच्या फ्लॅटमध्ये नंदू कालू अहिरे हे वीस लाखांच्या हेव्ही डिपॉझिटवर राहत असून त्यांचा करार जुलै 2024 रोजी संपणार आहे. त्यामुळे त्यांना फ्लॅटचा ताबा तेव्हाच मिळेल असे आधीच सांगितले होते.
ही अट मान्य करुन त्यांनी फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरु केला होता. याबाबत त्यांच्यात एक करार झाला होता. त्यात फ्लॅटवर एक कोटी पंधरा लाख रुपयांचे कर्ज होते, ती रक्कम दिल्यानंतर उर्वरित रक्कम साहेब सिंग यांना देण्याचे नमूद करण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे त्यांनी बँकेच्या कर्जाची परतफेड केली होती. तसेच उर्वरित रक्कम साहेब सिंग यांना दिली होती. या फ्लॅटसाठी रितू व तिचे पती अनुज कर्नावत यांनी साहेब सिंग पावणेदोन कोटीसह 7 लाख 12 हजार स्टॅम्प ड्युटी, 30 हजार 600 रुपये रजिस्ट्रेशन फिज म्हणून दिले होते. अशा प्रकारे त्यांनी त्यांना 1 कोटी 82 लाख 42 हजार 600 रुपये दिले होते. काही दिवसांनी त्यांनी बोरिवलीतील उपनिबंधक कार्यालयात फ्लॅटचे कायदेशीर करार केला होता.
मात्र करारात नमूद केल्याप्रमाणे जुलै 2024 रोजी त्यांनी त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. फ्लॅटचा ताबा मिळेपर्यंत त्यांनी त्यांना सप्टेंबर ते नोव्हेंबर 2024 या तीन महिन्यांचे 35 हजाराप्रमाणे भाडे दिले. सप्टेंबर महिन्यांत भाडेकरु फ्लॅट खाली करेल आणि नंतर त्यांना ताबा मिळेल असे सांगून त्यांनी त्यांचा शब्द पाळला नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच रितू आणि अनुज कर्नावत हे त्यांच्या सोसायटीमध्ये गेले होते. तिथे त्यांनी नंदू अहिरे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी त्यांना साहेब आणि मनप्रितकौर यांनी त्यांच्यासोबत नवीन भाडेकरार केल्याचे सांगून जुलै 2024 ते जुलै 2027 या तीन वर्षांसाठी वीस लाख रुपये हेव्ही डिपॉझिट म्हणून दिल्याचे सांगितले.
ही माहिती ऐकून त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन साहेब सिंग व त्याची पत्नी मनप्रितकौर सिंग यांनी फ्लॅटचा ताबा न देता भाडेकरुसोबत तीन वर्षांचा नवीन करार करुन त्यांच्याकडून हेव्ही डिपॉझिट म्हणून वीस लाख रुपये घेऊन त्यांची फसवणुक केली होती. या घटनेनंतर त्यांनी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. ते त्यांच्या घरी मिळून आले नाही. हा प्रकार उघडकीस येताच रितू कर्नावत हिने मालाड पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी पती-पत्नीविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर साहेब सिंग आणि मनप्रितकौर सिंग या दोघांविरुद्ध फ्लॅटसह स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशनसाठी 1 कोटी 82 लाख रुपये घेऊन फ्लॅटचा ताबा न देता रितू कर्नावत या तक्रारदार महिलेची फसवणुक केल्याप्रकरणी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत दिड महिन्यानंतर या कटातील मुख्य आरोपी साहेब सिंग याला बुधवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.