मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत अटकेची भीती दाखवून 1.27 कोटीची फसवणुक

फसवणुकीसाठी दया नायकचा वापर; बँक खाती पुरविणारा गजाआड

0

अरुण सावरटकर
30 जानेवारी 2026
मुंबई, – सीबीआयमधून दया नायक बोलत असल्याची बतावणी करुन मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत अटकेची भीती दाखवून टीआयएफआरमधून निवृत्त झालेल्या एका वयोवृद्ध अधिकार्‍याची फसवणुक कटातील एका आरोपीस पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलने अटक केली. परशुराम दशरथ जगताप असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. फसवणुकीसाठी परशुरामने सायबर ठगांना बँक खात्याची माहिती पुरविल्याचा आरोप आहे. याकामी त्याला काही ठराविक रक्कमेचे कमिशन मिळाल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

मन मोहन जौहरी हे 85 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार अंधेरीतील जुहू-वर्सोवा लिंक रोड परिसरात राहतात. कुलाबा येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमधून (टीआयएफआर) ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना पेंशन मिळत असून त्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. 30 ऑक्टोंबरला ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना संदीप राव नाव सांगणार्‍या व्यक्तीचा कॉल आला होता. त्याने तो बंगलोरच्या अशोकनगर पोलीस ठाण्याचा अधिकारी असल्याचे सांगून सदकत खान नावाच्या एका व्यक्तीला मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडे त्यांच्या बँकेचे एटीएम पासबुक सापडले आहे. त्यांच्या नावावर 75 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करुन त्यांची चौकशी होणार असल्याचे सांगितले.

या संपूर्ण प्रकरणाचा संमातर तपास दिल्ली पोलिसांसह सीबीआयचे अधिकारी करत आहे. या गुन्ह्यांत त्यांचा थेट संबंध असल्याचे पुरावे असून त्यांना कुठल्याही क्षणी अटक होईल. त्यांच्या त्यांच्या कुटुंबियांवर हल्ला होऊ शकतो. त्यांच्या मुलाची नोकरी जाऊ शकते असे सांगून त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. गोपनीयता आणि राष्ट्रहितासाठी चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांनी याबाबत कोणालाही काहीही माहिती देऊ नये. एकट्याने रुममध्ये चौकशीसाठी सहकार्य करावे. तसेच त्यांची चौकशी सीबीआयचे अधिकारी दया नायक करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्याशी दया नायक नाव सांगणार्‍या तोतया पोलिसांनी संभाषण केले. त्याने तो सीबीआय अधिकारी असून त्यांच्याविरुद्ध दाखल असलेला एफआयआर, अटक वॉरंट व्हिडीओ कॉलवरुन दाखविले.

या प्रकारामुळे ते प्रचंड घाबरले होते. त्याने त्यांचे सर्व बँक खाती गोठविण्याची धमकी दिली होती. ते वयोवृद्ध असल्याने त्यांना तात्काळ अटक होणार नाही, मात्र त्यांनी तपासात सहकार्य केले नाही, त्यांच्या सूचनांचे पालन केले नाही नाहीतर त्यांच्यावर कडक कारवाई होईल अशी धमकी दिली होती. त्याने त्यांना वेगवेगळे शासकीय दस्तावेज पाठवून त्यांची चौकशी सुरु असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान त्यांना विनय शर्मा नावाच्या व्यक्तीने कॉल करुन त्यांच्या मोबाईल क्रमांकावरुन अनधिकृत जाहिरातीसंदर्भात सतरा गुन्हे दाखल झाले आहे अशी माहिती दिली. चौकशीदरम्यान दया नायक व इतर अधिकार्‍यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती काढून त्यांना त्यांचे सर्व एफडी तोडून ती रक्कम बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्या खात्याची चौकशी होणार आहे. त्यामुळे त्यांना खात्यातील सर्व रक्कम त्याने दिलेल्या बँक खात्यात ट्रान्स्फर करावी लागेल असे सांगितले.

2 डिसेंबर ते 10 डिसेंबर 2025 या कालावधीत त्यांनी अटकेच्या भीतीने संबंधित बँक खात्यात 1 कोटी 27 लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. चौकशी पूर्ण होताच त्यांना त्यांची रक्कम परत मिळेल असे सांगण्यात आले होते. मात्र नंतर त्यांची चौकशी झाली नाही किंवा त्यांची रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाली नव्हती. त्यामुळे त्यांनी संबंधित पोलीस अधिकार्‍यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. हा प्रकार त्यांनी त्यांच्या मित्राला सांगितला. ही माहिती ऐकल्यानंतर त्याने त्यांची फसवणुक झाल्याचे सांगून त्यांना पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांनी सायबर हेल्पलाईनसह पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तोतयागिरी करुन फसवणुक करणे आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्यांचा सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरु होता. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढण्यात आली. त्यात परशुराम जगताप याचे नाव समोर आले होते. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना परशुराम जगतापला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. चौकशीत परशुरामने फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खात्याची माहिती पुरविली होती. याकामी त्याला या ठगांनी ठराविक रक्कम कमिशन म्हणून दिल्याचे उघडकीस आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page