41 लाखांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस अटक

पार्टनरशीपमध्ये व्यवसाय सुरु करण्याच्या बहाण्याने गंडा घातला

0

अरुण सावरटकर
3 फेब्रुवारी 2026
मुंबई, – सुमारे 41 लाख रुपयांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस पाच महिन्यानंतर कांदिवली पोलिसांनी अटक केली. भावेश रघुनाथ राऊत असे या 45 वर्षांच्या आरोपीचे नाव असून त्याच्यावर पार्टनरशीपमध्ये व्यवसाय सुरु करण्याच्या बहाण्याने तक्रारदाराची फसवणुक केल्याचा आरोप आहे. भावेशने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

योगेश किसन वानखेडे हे कांदिवलीतील चारकोप परिसरात राहत असून अंधेरीतील एका खाजगी कंपनीत 2019 पासून सिइअर अकाऊंटट म्हणून काम करतात. जानेवारी 2022 रोजी ते त्यांच्या मित्रासोबत फ्लॅट पाहण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांची भावेश राऊतशी ओळख झाली होती. त्याला शेअरबाबत प्रचंड ज्ञान होते, त्याचा शेअरमार्केटमधील ज्ञान पाहून त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी एकमेकांचे मोबाईल शेअर केले होते. काही दिवसांनी त्यांना भावेश कांदिवलीतील एका हॉटेलमध्ये भेटला होता. या भेटीत त्याने तो अनेकांचे पैसे शेअरमार्केटमध्ये गुंतवून त्यांना चांगला परवाता देत असल्याचे सांगितले होते. यावेळी त्याने त्यांनाही शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देताना त्यांना चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिले होते.

त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याच्याकडे शेअरसाठी 25 हजाराची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर तो त्यांना दिवसाला तीनशे रुपये देत होता. याच दरम्यान त्याने त्यांना स्वतचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार असल्याचे सांगून त्यांना त्याच्या व्यवसायात पार्टनर बनवितो असे सांगितले. त्यात ठराविक रक्कम गुंतवणुक करुन मिळणारा प्रॉफिट आपसांत वाटून घेण्याचे आश्वासन देत त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. फेब्रुवारी 2022 रोजी त्यांची कांदिवलीतील एका हॉटेलमध्ये पुन्हा भेट झाली होती. या भेटीत त्याने त्यांना पार्टनरशीपमध्ये एक ब्रोकरेज कंपनी सुरु करण्याचा सल्ला दिला होता. यावेळी योगेश वानखेडे यांनी त्यांच्याकडे गुंतवणुकीसाठी पैसे नसल्याचे सांगून त्यांची चार गुंठे जमिन तारण ठेवून कर्ज घेतो असे सांगितले होते.

याच दरम्यान भावेशने त्यांची चेतन कावाशी ओळख करुन दिली होती. त्याने त्यांना विविध बँका आणि वित्तीय संस्थेकडून कर्ज घेण्यास मदत करतो असे सांगितले होते. ठरल्याप्रमाणे त्याने त्यांच्या नावावर विविध बँकासह वित्तीय संस्थेकडून 43 लाख 57 हजार 603 रुपये घेतले होते. या कर्जासाठी त्यांनी आतापर्यंत बँकासह वित्तीय संस्थेत 17 लाख 16 हजार 735 रुपये जमा केले होते. तसेच लोन प्रोसेसिंगसाठी 3 लाख 23 हजार रुपये जमा केले होते. ही रक्कम नंतर त्यांनी भावेशला व्यवसायासाठी ट्रान्स्फर केली होती. त्यापैकी त्याने त्यांना दोन लाख वीस हजार रुपये परत केले होते. चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून त्याने त्यांना गुंतवणुकीवर कुठलाही परतावा दिला नव्हता.

याबाबत विचारणा केल्यानंतर तो त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न केा होता. याच दरम्यान त्यांना भावेशने व्यवसायासाठी घेतलेली रक्कम व्यवसायात न गुंतविता त्याचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर केला होता. त्याने त्यांच्याप्रमाणे अनेकांना व्यवसायासात गुंतवणुक करण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणुक केल्याचे समजले होते. हा प्रकार समजताच त्यांनी त्याला पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली होती. यावेळी त्याने त्यांना व्याजासहीत पैसे देण्याचे आश्वासन दिले, मात्र दोन वर्ष उलटूनही त्याने त्यांना पैसे परत केले नाही. त्यामुळे त्यांनी भावेश राऊतविरुद्ध कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच भावेश हा पळून गेला होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या पाच महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या भावेशला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याने तक्रारदारासह आणखीन किती लोकांना व्यवसायाचे आमिष दाखविले आहे, त्यांच्याकडून किती रुपये व्यवसायासाठी घेऊन त्यांची फसवणुक केली आहे याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page