भारतीय चलन क्रिप्टो करन्सीमध्ये कन्व्हर्टची बतावणी करुन गंडा

फसणवणुक करणार्‍या टोळीचा पर्दाफाश करुन दोघांना अटक

0

अरुण सावरटकर
9 फेब्रुवारी 2026
मुंबई, – भारतीय चलन युएसडीटी क्रिप्टो करन्सीमध्ये कन्व्हर्ट करुन देतो असे सांगून एका व्यावसायिकासह त्याच्या मित्रांची सुमारे 30 लाखांची फसवणुक करणार्‍या एका टोळीचा मालाड पोलिसांनी पर्दाफाश केला. या कटातील दोन मुख्य आरोपींना मालाड पोलिसांनी अटक केली. फरहान मकबूल हसन चौधरी आणि सलमान एजाज अहमद शेख अशी या दोघांची नावे आहेत. याच गुन्ह्यांत दोन्ही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्यांच्या इतर काही सहकार्‍यांची नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

शान मोहम्मद खान हे गोवंडीतील देवनारचे रहिवाशी आहेत. त्यांचा नॅचरल स्पाईसेस नावाने मसाला विक्रीचा व्यवसाय असून गेल्या 28 वर्षांपासून ते या व्यवसायात आहेत. त्यांचा नारायण हरि सिंग हा शाळेपासूनचा मित्र आहे. तो पुणे येथे सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. त्याने नोकरी सोडली असून तो स्वतचा व्यवसाय सुरु करण्यासाठी मुंबईत आला होता. डिसेंबर 2025 रोजी त्याने भारतीय चलन युएसडीटी क्रिप्टो करन्सीमध्ये कर्न्व्ट केल्यास चांगला फायदा होतो. त्यासाठी त्याने एक अ‍ॅप तयार केले होते. या अ‍ॅपद्वारे तो ट्रेडिंग करत असल्याचे सांगितले होते. यावेळी त्याने त्यांना तीस लाख रुपयांची मदत करण्याची विनंती करुन त्यांचे पैसे युएसडीटी क्रिप्टो करन्सीमध्ये कन्व्हर्ट करण्याची विनती केली होती.

नारायण हा त्यांचा मित्र असल्याने, त्याच्यावर कर्ज असल्याने त्यांनी त्याला मदत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडील नऊ लाख तसेच इतर मित्रांकडून पैसे जमा करुन त्याला तीस लाख रुपये जमा केले होते. याकामी त्यांच्या परिचित कोणीही व्यक्ती नव्हता. त्यामुळे त्यांनी अशाच प्रकारे भारतीय चलन क्रिप्टो करन्सीमध्ये कन्व्हर्ट करणारा व्यक्तीचा शोध घेत होते. याच दरम्यान त्यांना त्यांच्या एका मित्राने मालाड येथे सलमान नावाचा एक व्यक्ती अशा प्रकारे व्यवसाय करतो. त्यामुळे ते नारायणसोबत सलमानला भेटण्यासाठी मालाड येथे गेले होते. सलमानचा मालाडच्या धुक्का चेंबर, पोद्दार रोड, मॅजिक स्क्वेअरमध्ये नरेश इंटरप्रायजेस नावाचे एक कार्यालय होते. यावेळी त्याच्या कार्यालयता इतर काहीजण होते. त्यात फरहान नावाचा एक तरुण होता. सलमानने फरहान हाच त्यांना भारतीय चलन युएसडीटी क्रिप्टो करन्सीमध्ये कन्व्हर्ट करुन देईल असे सांगितले.

काही वेळानंतर ते दोघेही त्यांना घेऊन नटराज मार्केटमधील के अमृतलाल अ‍ॅण्ड कंपनीच्या कार्यालयाजवळ घेऊनआलेह ोते. तिथे त्यांनी त्यांची ओळख करण आणि इतर काही तरुणाशी करुन दिली होती. यावेळी करणने त्यांना डेमो दाखवून नतर डिलिंग करु असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. त्याने दाखविलेल्या डेमोवर विश्वास ठेवून त्यांनी त्यांना तीस लाख रुपये दिले होते. ही रक्कम त्यांनी अन्य एका व्यक्तीला दिली. काही वेळानंतर सलमान आणि ओमकार बाहेर गेले. बराच वेळ होऊन ते दोघेही आले नाही. ते दोघेही त्यांच्या इतर सहकार्‍यांसोबत तेथून पळून गेले होते.

याच दरम्यान तिथे पाच ते सहा महिला आणि तीन इसम आले. त्यांनी त्यांना शिवीगाळ करुन कार्यालयाबाहेर काढले. या प्रकारानंतर त्यांनी सलमान, फरहान आणि करण या तिघांना कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या तिघांचेही कॉल बंद होते. करण, सलमान, फरहान यांनी इतर आरोपींच्या मदतीने भारतीय चलन युएसडीटी क्रिप्टो करन्सीमध्ये कन्व्हर्ट करुन देतो असे सांगून त्यांच्याकडून तीस लाख रुपये घेऊन पलायन केले. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच शान मोहम्मद खान यांनी मालाड पोलिसांना घडलेला प्रकार सांगून पाचही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी करण, सलमान, फरहान, गोपाळ व अन्य एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुर असतानाच पळून गेलेल्या फरहान चौधरी आणि सलमान शेख या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच त्यांच्या इतर सहकार्‍यांच्या मदतीने ही फसवणुक केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

याच गुन्ह्यांत दोन्ही आरोपींची चौकशी सुरु असून त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचे नावे समोर आली असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page