फसवणुकीच्या गुन्ह्यांत आर्या ज्वेलर्सच्या मालकाला अटक

दागिने बनविण्यासाठी दिलेल्या 24 लाखांच्या सोन्याचा अपहार

0

अरुण सावरटकर
12 फेब्रुवारी 2026
मुंबई, – फसवणुकीच्या गुन्ह्यांत गेल्या दिड महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या आर्या ज्वेलर्सचा मालक दिनेश धनगिरी गोस्वामी याला मंगळवारी मालाड पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर सोन्याचे दागिने बनविण्यासाठी दिलेल्या सुमारे 24 लाख रुपयांच्या 178 ग्रॅम वजनाच्या सोन्याचा अपहार करुन एका ज्वेलर्स व्यापार्‍याची फसवणुक केल्याचा आरोप आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत दिनेश गोस्वामी याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून इतर काही फसवणुकीच्या गुन्हयांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महेंद्र केशवलाल ठक्कर हे 68 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार मालाड परिसरात राहत असून ते ज्वेलर्स व्यापारी आहेत. त्यांचा सोन्याचा दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे. त्यांची श्री भोमिया जेम्स नावाची मालाडच्या काचपाडा परिसरात एक शॉप आहे. या शॉपमध्ये त्यांच्यासह त्यांचा मुलगा जिमित हे सर्व व्यवहार पाहतात. ऑगस्ट 2025 रोजी गोरेगाव येथे ज्वेलरीचे एक प्रदर्शन होते, तिथेच त्यांनी त्यांच्या कंपनीचा एक स्टॉल लावला होता. तिथै त्यांची ओळख अमिता व तिचा पती दिनेश गोस्वामीशी ओळख झाली होती. त्यांनी त्यांचे आर्या ज्वेलर्स नावाचे एक दुकान असून ते विविध सोन्याचे डिझाईन बनवून दागिने तयार करत असल्याचे सांगितले होते. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्यांनी त्यांचे काही सोन्याच्या दागिन्यांचे डिझाईन दाखविले होते.

त्यांनी त्यांना त्यांच्यासाठी काही डिझाईन तयार करुन देण्याचे आश्वासन दिले होते. काही दिवसांनी त्यांचा मुलगा जिमित हा गोस्वामी यांच्या भाईंदर येथील राम मंदिर रोड, नर्मदा निवासमधील आर्या ज्वेलर्सच्या कारखान्यात गेला होात. तिथे त्यांच्यात विविध डिझाईनचे सोन्याच्या दागिन्याबाबत चर्चा झाली होती. यावेळी जिमितने त्यांना दागिने बनविण्यासाठी काही सोने देण्याचे आश्वासन दिले होते. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांना डिसेंबर 2025 पर्यंत 178 ग्रॅम वजनाचे 24 लाखांचे सोने दागिने बनविण्यासाठी दिले होते. यावेळी दिनेशने त्यांना 25 दिवसांत दागिने बनविण्याचे आश्वासन दिले होते,

मात्र महिना उलटूनही त्याने दागिने बनवून दिले नाही. त्याला कॉल केल्यानंतर तो त्यांच्याकडे मुदत वाढवून घेत होता. नंतर त्याने त्याचा मोबाईल बंद केला होता. वारंवार कॉल करुनही त्यांचा दिनेशशी संपर्क झाला होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच ते स्वत त्याच्या भाईंदर येथील कारखान्यात गेले होते. तिथे त्यांना कारखान्याला कुलूप असल्याचे दिसून आले. विविध सोन्याचे दागिने बनवून देतो असे सांगून दिनेश 24 लाखांचे 178 ग्रॅम वजनाचे सोने घेऊन पळून गेला होता. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी दिनेश गोस्वामी याच्याविरुद्ध मालाड पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी सोन्याचा अपहार करुन त्यांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होण्यापूर्वीच दिनेश हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या दिड महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या दिनेशला मंगळवारी मालाड पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. चौकशीत त्याने या गुन्ह्यांची कबुली दिली. याच गुन्ह्यांत त्याला दुसर्‍या दिवशी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही ज्वेलर्स व्यापार्‍यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page