मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ एप्रिल २०२४
मुंबई, – बॉलीवूडच्या एका प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरची ऑनलाईन फसवणुक केल्याप्रकरणी हिमांशू नायक नावाच्या एका आरोपीस सायबर सेल पोलिसांनी अटक केली. शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून ही फसवणुक झाल्याचे पोलिसांनी सांगितले. हिमांशू हा फसवणुक करणार्या सायबर ठगांना मदत करत असून त्याने त्यांच्यासाठी बँक खाते उघडून दिले होते. याकामी त्याला ५० हजार रुपयांचे कमिशन मिळाले होते. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या अटकेने ऑनलाईन फसवणुकीचे इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
यातील तक्रारदार बॉलीवूडचे प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर आहेत. ते सोशल मिडीयावर ऍक्टिव्ह असतात. जानेवारी महिन्यांत त्यांना एका सोशल साईटवर शेअर ट्रेडिंगसंदर्भात जाहिरात असलेली लिंक दिसली होती. ही लिंक ओपन केल्यानंतर अज्ञात व्यक्तीने त्यांना एका व्हॉटअप ग्रुपमध्ये ऍड केले होते. या ग्रुपमध्ये शेअर ट्रेडिंगसंदर्भात विविध माहिती अपलोड करुन गुंतवणुकीबाबत माहिती दिली जात होती. या माहितीवर विश्वास ठेवून त्यांनी शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. यावेळी ऍडमिन असलेल्या एका महिलेने एका खाजगी कंपनीच्या आयपीओमधून गुंतवणुकीचा सल्ला देत त्यांना चांगला परतावा मिळेल असे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी गुंतवणुकीसाठी एक अकाऊंट उघडले होते. या अकाऊंटच्या माध्यमातून त्यांनी शेअर ट्रेडिंगमध्ये सुमारे साडेचार लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला फायदा होत असल्याचे दिसून आले. मात्र ही रक्कम त्यांना काढता येत नव्हती. ती रक्कम काढण्यासाठी त्यांना विविध टॅक्स म्हणून पैसे भरण्यास सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी ही रक्कम न भरता त्याची सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन या पथकाने मध्यप्रदेशातून हिमांशू नायकला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत तो ऑनलाईन फसवणुक करणार्या सायबर ठगांना मदत करत असल्याचे उघडकीस आले होते. त्यांनी या ठगांसाठी विविध बँकेत खाते उघडून दिले होते. याच बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा होत होती. या रक्कमेतून त्याला ठराविक रक्कम कमिशन म्हणून मिळत होती. आतापर्यंंत त्याला ५० हजार रुपयांचे कमिशन मिळाले असून या पैशांतून त्याने मौजमजा केल्याचे पोलिसांना सांगितले. त्याच्या चौकशीतून त्याच्या इतर सहकार्यांची नावे समोर आली आहेत. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.