लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने ज्वेलर्स व्यापार्याला खंडणीसाठी धमकी
खंडणीच्या गुन्ह्यांत चार आरोपींना अटक तर इतरांचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 फेब्रुवारी 2026
मुंबई, – लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने एका ज्वेलर्स व्यापार्याला वीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकी देऊन खंडणीचा पाच लाख रुपयांचा हप्ता घेण्यासाठी आलेल्या चार आरोपींना विलेपार्ले पोलिसांनी अटक केली आहे. दिपक नरेंद्र डंगोल, माजिद साजिद खान, फैजान फिरोज खान आणि साहिल इलियास शेख अशी या चौघांची नावे असून ते चौघेही मुंबईसह पुण्यातील रहिवाशी आहे. खंडणीच्या याच गुन्ह्यांत चारही आरोपींना अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
यातील तक्रारदार ज्वेलर्स व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत विलेपार्ले परिसरात राहतात. 12 फेब्रुवारी ते त्यांच्या घरी होते, यावेळी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो लॉरेन्स बिष्णोई टोळीचा सदस्य बोलत असल्याचा दावा केला होता. त्याने त्यांच्याकडे वीस लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. खंडणीची रक्कम दिली नाहीतर त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सुरुवातीला त्यांनी या कॉलकडे दुर्लक्ष केले होते. मात्र त्यांना वेगवेगळ्या मोबाईलवरुन लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने खंडणीसाठी धमकी येत होती. टोकन म्हणून त्यांच्याकडे अज्ञात व्यक्ती पाच लाखांची मागणी करत होते. पैसे दिले तर ठिक नाहीतर तुझा गेम करणार अशी धमकीच या व्यक्तीने दिली होती.
या धमकीनंतर ते प्रचंड घाबरले होते. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार विलेपार्ले पोलिसांना सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत विलेपार्ले पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर तक्रारदार ज्वेलर्स व्यापार्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांच्या सूचनेवरुन त्यांना अज्ञात व्यक्तींना पाच लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. ही रक्कम घेण्यासाठी त्याला बोलाविले होते. ठरल्याप्रमाणे मंगळवारी तिथे दिपक डंगोल, माजिद खान, फैजान खान आणि साहिल शेख हे चौघेही खंडणीची रक्कम घेण्यासाठी आले होते. यावेळी आधीच पाळत ठेवलेल्या पोलिसांनी चारही आरोपींना शिताफीने अटक केली.
तपासात त्यांनीच तक्रारदारांना खंडणीसाठी धमकी दिल्याची कबुली दिली. यातील दिपक आणि फैजान हे दोघेही पुण्याचे रहिवाशी असून दिपक कुक तर फैजान एसी दुरुस्तीचे काम करतो. माजिद आणि साहिल हे दोघेही गोवंडीतील चिता कॅम्प, अणुशक्तीनगरचे रहिवाशी असून माजिद बॅग विक्रेता तर साहिल कपड्याचे दुकान आहे. गेल्या काही दिवसांत लॉरेन्स बिष्णोईने शहरात दशहतीचे वातावरण निर्माण केले होते. सिनेअभिनेता सलमान खान तसेच निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर लॉरेन्सने त्याचा सहकारी शुभम लोणकर याच्या मदतीने गोळीबार केला होता. त्यापूर्वी त्याने माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धीकी यांची हत्या केली होती.
या तिन्ही गुन्ह्यांत लॉरेन्स बिष्णोईचे नाव समोर आल्याने शहरातील बॉलीवूडसह उद्योग जगतात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याचाच फायदा घेऊन अटक आरोपींनी तक्रारदारांना कॉलवरुन खंडणीसाठी धमकी दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर या सर्वांना मंगळवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्यांच्या इतर सहकार्यांचे नाव समोर आले आहे. त्यांचा पोलिसाकडून शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.