डेबीट कार्डची अदलाबदली करुन फसवणुक करणारा भामटा गजाआड
तीन गुन्ह्यांची उकल तर विविध बँकेचे 71 डेबीट कार्ड हस्तगत
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
19 फेब्रुवारी 2026
मुंबई, – एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी जाणार्या खातेदारांना विशेषता वयोवृद्धांना टार्गेट करुन त्यांच्या डेबीट कार्डची अदलाबदल करुन फसवणुक करणार्या एका भामट्याला गजाआड करण्यात कस्तुरबा मार्ग पोलिसांना यश आले आहे. फ्रॉन्सिस पॅट्रीक फर्नाडिस असे या 37 वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्या अटकेने तीन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी विविध बँकेचे 71 डेबीट कार्ड जप्त केले आहेत. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
75 वर्षांचे संतोष शिवा नाईक हे बोरिवलीतील कार्टर रोड क्रमांक नऊमध्ये राहतात. 7 फेब्रुवारीला ते त्यांच्या बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी तिथे आलेल्या एका तरुणाने त्यांना पैसे काढण्यास मदत करतो असे सांगून त्यांचा डेबीट कार्डसह पासवर्ड घेतला. त्यानंतर त्यांच्या डेबीट कार्डची अदलाबदल करुन त्यांच्या बँक खात्यातून दहा हजार रुपये काढून फसवणुक केली होती. हा प्रकार नंतर संतोष नाईक यांच्या लक्षात येताच त्यांनी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गेल्या काही दिवसांत अशाच काही तक्रार पोलिसांना प्राप्त झाले होते. त्यामुळे या तक्रारीची अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त महेश चिमटे, सहाय्यक पोलीस आयुक्त मालोजी शिंदे यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणवरे, पोलीस निरीक्षक सुभाष जाधव, जयमाला वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला थोरात, पोलीस उपनिरीक्षक अनिकेत शिंदे, पोलीस हवालदार राजेश पेडणेकर, तनवीर मुजावर, करुणेश म्हात्रे, पोलीस शिपाई महांतेश सवळी, अमोल फोपसे, तुषार पुजारी, अनिकेत सकपाळ, राहुल सांगळे, विकेश शिंगटे, राहुल वडर, प्रविण फरडे आणि महादेव पुरी यांनी तपास सुरु केला होता.
एटीएम सेंटरसह परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची तपासणी करुन आरोपीची ओळख पटविणयाचा प्रयत्न सुरु केला होता. या फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोसिांनी फ्रॉन्सिस फर्नाडिस याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यांसह त्याचा इतर दोन गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला. त्याच्या अटकेने कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यातील तीन फसवणुकीसह आयटी गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले होते.
त्याच्याकडून पोलिसांनी विविध बँकेचे 71 डेबीट कार्ड ताब्यात घेतले आहे. तो रेकी करुन एटीएम सेंटरमध्ये जाणार्या खातेदारांना विशेषता वयोवृद्धांना टार्गेट करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. फ्रॉन्सिस हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून सध्या अंधेरीतील विरा देसाई सोराटा पांडा, पांडू मिस्त्री चाळीत राहतो. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.