मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
20 फेब्रुवारी 2026
मुंबई, – खिडकीचे ग्रील तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश करुन सुमारे 50 लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पळून गेलेल्या एका मुख्य आरोपीस आंबोली पोलिसांनी अटक केली. सुरज चंद्रसिंग पवार असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यात सूर्यमनी नाडर, जयवंत चंद्रसिंग पवार आणि सूर्या कडवी मुदलीयार यांचा समावेश असून सुरज पवार या गुन्ह्यांतील चौथा आरोपी आहे. या टोळीकडून पोलिसांनी चोरीचा काही मुद्देमाल हस्तगत केला असून उर्वरित मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार आहे.
यातील 65 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार जोएल क्लेमंट रॉड्रिक्स हे व्यवसायाने व्यावसायिक असून त्यांचा व्हिंटेज कारचा व्यवसाय आहे. ते त्यांच्या पत्नीसोबत अंधेरीतील चार बंगला आरटीओ लेन परिसरात तर त्यांचे दोन मुले कॅनडा आणि दिल्लीत राहतात. त्यांचा लहान मुलगा रायन यांचे लग्न असल्याने ते विवाहासाठी पॅलेस बुक करण्यासाठी 3 फेब्रुवारीला जयपूरला पत्नीसोबत गेले होते. यावेळी त्यांच्या घरात कोणीही नव्हते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला होता. कपाटातील सुमारे 50 लाखांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने घेऊन या चोरट्याने चोरी करुन पलायन केले होते.
दुसर्या दिवशी हा प्रकार त्यांच्या एका कर्मचार्याला लक्षात येताच त्याने फोनवरुन ही माहिती त्यांना दिली होती. त्यानंतर ते त्यांच्या पत्नीसोबत जयपूरहून मुंबईत आले होते. तपासात चोरट्याने त्यांच्या फ्लॅटच्या खिडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश करुन ही चोरी केली होती. याप्रकणी आंबोली पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी गेल्या आठवड्यात सूर्या मुदलीयार या संशयिताला ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीनंतर पोलिसांनी सूर्यमनी नाडर आणि जयवंत पवार या दोघांना ताब्यात घेतले होते.
या तिघांच्या चौकशीत त्यांनीच ही घरफोडी केल्याचे उघडकीस आले होते. याकामी त्यांना सुरज पवार याने मदत केली होती. मात्र या तिघांच्या अटकेनंतर तो पळून गेला होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना सुरज पवारला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी चोरीचा काही मुद्देमाल हस्तगत केला आहे. इतर मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगतले.