कारची काच फोडल्याच्या रागातून तरुणांवर प्राणघातक हल्ला
हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांतील आरोपीस नऊ महिन्यांनी अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
22 फेब्रुवारी 2026
मुंबई, – कारची काच फोडल्याच्या रागातून साऊद जुबेर बॅलिम या 29 वर्षांच्या तरुणावर तिक्ष्ण हत्यारासह लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण करुन प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी एका वॉण्टेड आरोपीस मालवणी पोलिसांनी अटक केली. मोहम्मद जुबेर सिद्धीक मेमन असे या आरोपीचे नाव असून हत्येसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच तो गेल्या नऊ महिन्यांपासून फरार होता, अखेर त्याला पोलिसांनी अटक केली. पोलीस कोठडीत असलेल्या मोहम्मद जुबेरची पोलिसांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
साऊद बॅलिम हा मालाडच्या मालवणी परिसरात राहत असून मालाडच्या एका कॉल सेंटरमध्ये कामाला आहे. 9 मे 2025 रोजी नमाज पढल्यानंतर तो त्याच्या मित्रांसोबत जेवणासाठी सकलेणी शॉपमध्ये गेला होता. यावेळी त्याला त्याचा मित्र फैजान सिद्धीकी याच्या कारच्या कोणीतरी काच फोडल्याचे समजले होते. त्यामुळे तो त्याच्या मित्रांसोबत मालवणीतील म्हाडा, बालवाडी ग्राऊंड, प्लॉट क्रमांक 86 जवळ गेला होता. याच दरम्यान तिथे मोहम्मद जुबेरसह इतर सात ते आठजण तिथे आले होते.
कारची काच फोडल्यावरुन त्यांनी त्याच्याशी वाद घालण्यास सुरु केला हेता. त्यांनी त्यांचा मित्र फैजानला मारहाण करण्यास सुरुवात केली, त्यामुळे साऊद त्याला वाचविण्यासाठी पुढे आला होता. त्याचा राग आल्याने त्यांनी त्याच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. त्यांना लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यात त्याच्या डोक्याला आणि कानाला गंभीर दुखापत झाली होती.
रक्तबंबाळ झाल्याने साऊदला बेशुद्धावस्थेत तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. ही माहिती मिळताच मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी साऊद बॅलिमच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन महिला, सोहेल मेमन, कॅज मेमन, जुबेर मेमन, शहबाज, इम्तियाजसह इतर नऊजणांविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
याच गुन्ह्यांत पळून गेलेल्या काही आरोपींना पोलिसांनी अटक केली. मात्र गुन्हा दाखल होताच मोहम्मद जुबेर हा पळून गेला होता. गेल्या नऊ महिन्यांपासून तो फरार होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना त्याला दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.