हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट देण्याच्या आमिषाने वयोवृद्धाची फसवणुक
माहीम येथील घटना; महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ एप्रिल २०२४
मुंबई, – हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून एका म्युझिशियन वयोवृद्धाकडून घेतलेल्या सुमारे ३४ लाख रुपयांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी मरियम सय्यद या महिलेविरुद्ध माहीम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अर्शद अहमद इक्बाल अहमद हे ६१ वर्षांचे वयोवृद्ध माहीम येथील एल. जे क्रॉस रोड, पॅराडाईज सिनेमागृहाजवळील क्षितीज अपार्टमेंटमध्ये राहत असून ते म्युझिशियन आहेत. त्यांचे राहते घर मोडकळीस आले असून त्यासाठी त्यांना त्यांच्या फ्लॅटचे नूतनीकरण करायचे होते. तोपर्यंत त्यांना भाड्याने एका फ्लॅटची गरज होती. ही माहिती त्यांनी मरियमला सांगितली होती. यावेळी तिने तिला माहीम परिसरात हेव्ही डिपॉझिटवर एक फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. काही दिवसांनी तिने त्यांना कापड बाजार रोड, न्यू रिलॉन्स अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट दाखविला होता. हा फ्लॅट सायरा दिदी या महिलेच्या मालकीचा होता. या फ्लॅटची पाहणी केल्यानंतर त्यांनी तोच फ्लॅट डेव्ही डिपॉझिटवर घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांनी मरियमला तीस लाख रुपये धनादेश तर चार लाख रुपये कॅश स्वरुपात दिले होते. त्यानंतर मरियमने त्यांना जानेवारी महिन्यांत फ्लॅटचा ताबा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दोन महिने उलटूनही तिने फ्लॅटचा ताबा दिला नाही. त्यामुळे त्यांनी तिला फोन केला असता ती त्यांना प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे त्यांनी व्हॉटअपवर मॅसेज करुन फ्लॅटच्या ताबा देण्याबाबत विचारणा केली होती. फ्लॅटचा ताबा देत नसशील तर त्यांचे पैसे परत कर नाहीतर तिच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करणार असल्याचा एक मॅसेज पाठविला हेता. मात्र तिने त्यांच्या मॅसेजलाही प्रतिसाद दिला नाही. या घटनेनंतर त्यांनी सायरा दिदीची भेट घेऊन तिच्याकडे फ्लॅटची मागणी केली होती. मात्र तिनेही त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. फ्लॅटची चावी ती मरियमला देणार असल्याचे सांगितले.
अशा प्रकारे तिने फ्लॅटचा ताबा देण्यावरुन टोलवाटोलवी करुन हेव्ही डिपॉझिटसाठी घेतलेल्या सुमारे ३४ लाखांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी मरियमविरुद्ध माहीम पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी मरियमविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच तिची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर तिच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करु असे सांगितले.