मोबाईल पाहण्यावरुन पत्नीवर कोयत्याने प्राणघातक हल्ला
हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत पतीला अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
24 फेब्रुवारी 2026
मुंबई, – मोबाईल पाहण्यासह कौटुंबिक वादातून निता विश्वनाथ भोपळे या 48 वर्षांच्या महिलेवर तिच्याच पतीने कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना अंधेरी परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपी पती संतोष फकीरा रावते (44) याला अटक केली आहे. याच गुन्ह्यांत त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान जखमी झालेल्या नितावर ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना रविवारी रात्री साडेनऊ वाजता अंधेरीतील एमआयडीसी, कनाकिया, सह्योग एसआरए सोसायटीमध्ये घडली. याच सोसायटीच्या तेराव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 1303 मध्ये निता ही तिच्या दोन मुले आणि संतोष रावते या पतीसोबत राहते. ती नोकरी करत असून तिचा पती संतोष काहीच कामधंदा करत नाही. गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये क्षुल्लक कौटुंबिक कारणावरुन वाद होत होते. त्यातून तो तिला शिवीगाळ करुन मारहाण करत होता.
रविवारी रात्री साडेनऊ वाजता ती घरात मोबाईल पाहत होती. यावेळी मोबाईलसह कौटुंबिक कारणावरुन त्याने तिच्याशी पुन्हा वाद घालण्यास सुरुवात केली होती. त्यात त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्याच्या रागाच्या त्याने कोयत्याने तिच्यासह तिच्या मुलावर प्राणघातक हल्ला केला होता.
या हल्ल्यात निताच्या दोन्ही हातांना, करंगळीला आणि डोक्याला तर तिच्या सात वर्षांचा मुलगा वरद याच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. अचानक झालेल्या आरडाओरडीनंतर स्थानिक रहिवाशांनी तिथे धाव घेतली होती. यावेळी त्यांना हा प्रकार समजला होता. ही माहिती स्थानिक रहिवाशांकडून समजताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या निताला नंतर जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात होते. तिथेच तिच्यावर उपचार सुरु आहेत.
तिची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीनंतर घडललेा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी पती संतोष रावते याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या संतोषला सोमवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.