८३ लाखांच्या दागिन्यांचा अपहार करुन पाच व्यापार्यांची फसवणुक
ज्वेलर्स व्यापार्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ एप्रिल २०२४
मुंबई, – क्रेडिटवर घेतलेल्या सुमारे ८३ लाख रुपयांच्या विविध सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करुन काळबादेवी येथील पाच व्यापार्याची केली. याप्रकरणी भरत रमेशचंद्र सुरु या ज्वेलर्स व्यापार्याविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला आहे.
समीर प्रभाकर माझी हे बोरिवलीतील योगीनगर परिसरात राहत असून ते ज्वेलर्स व्यापारी आहेत. त्यांचा काळबादेवी येथे संकरी ज्वेल्स नावाचे एक दुकान असून ते सोन्याचे दागिने बनवून त्याची होलसेल विक्री करतात. त्यांच्याकडून विविध सोन्याचे व्यापारी सोने देऊन दागिने बनवून घेतात. काळबादेवी परिसरात भरत सुरु या ज्वेलर्स व्यापार्याचे एक दुकान असून ते त्यांच्या परिचित आहेत. काही महिन्यांपूर्वी त्याने त्यांना १६ सोन्याच्या बांगड्या बनविण्याची ऑर्डर दिली होती. त्यामोबदल्यात तो त्यांना शुद्ध सोने व उर्वरित कॅश देणार होता. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याला सोळा सोन्याच्या बांगड्या बनवून दिले होते. अशाच प्रकारे भरत सुरु याने मार्केटमधील कपूरचंद पारसनाथ सोनी, उत्तम रेबोती जाना, बशीरुल बाबू शेख, ईश्वर मनमोहन सोनी यांच्याकडून विविध सोन्याचे दागिने क्रेडिटवर बनवून घेतले होते. त्यांनाही त्याने शुद्ध सोने आणि कॅशद्वारे पेमेंट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र समीर माझीसह इतर चार ज्वेलर्स व्यापार्याकडून सुमारे ८३ लाख रुपयांचे १३५७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन दागिन्यांचे पेमेंट न करता फसवणुक केली होती. याबाबत भरत सुरुबाबत चौकशी केली असता तो त्याचे दुकान बंद करुन पळून गेला होता. त्यांच्याकडून घेतलेल्या दागिन्यांची त्याने परस्पर इतर व्यापार्यांना विक्री करुन त्यांच्या सुमारे ८३ लाखांचा अपहार केला होता. हा प्रकार उघडकीस येताच या पाचही व्यापार्यांना एल. टी मार्ग पोलिसांना घडलेला प्रकार सांगून भरत सुरु याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पळून गेलेल्या भरतचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. भरतने या पाच व्यापार्यांसह इतर काही व्यापार्यांना अशाच प्रकारे गंडा घातल्याचे बोलले जाते.