गुंतवणुकीच्या बहाण्याने टी सिरीजच्या अधिकार्‍याची फसवणुक

व्यावसायिक मित्राविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 फेब्रुवारी 2026
मुंबई, – चांगला परतावा देण्याची बतावणी करुन व्यवसायात गुंतवणुक करण्याचा सल्ला देऊन टी सिरीजच्या एका अधिकार्‍याची त्याच्याच व्यावसायिक मित्राने सुमारे तीस लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सुहेल आयुब पटेल या व्यावसायिक मित्राविरुद्ध बांगुरनगर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सुहेलने व्यवसायात गुंतवणुकीच्या नावाने इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा तपास सुरु आहे. गुन्हा दाखल झाल्याने त्याला चौकशीसाठी हजर राहण्याचे लवकरच समन्स बजाविले जाणार आहे.

आलोककुमार निरंकार शुक्ला हे अंधेरी येथे राहत असून सध्या टी सिरीज या कंपनीत कामाा आहे. सुहेल हा त्यांच्या परिचित असून गेल्या पाच वर्षांपासून ते दोघेही एकमेकांना ओळखतात. त्याचे तीन कंपन्या असून या तिन्ही कंपन्यांचे कार्यालय मालाड परिसरात आहे. नोव्हेंबर 2024 रोजी ते त्याच्या कंपनीच्या कार्यालयात गेले होते. यावेळी त्याने त्याच्या कंपनीत गुंतवणुक करण्याचा सल्ला देताना त्यांना गुंतवणुकीवर चांगला परतावा म्हणजे दरमाह दिड लाख रुपये देण्याचे आमिष दाखविले होते.

त्याच्या या आमिषाला बळी पडून त्यांनी त्याच्या कंपनीत टप्याटप्याने तीस लाखांची गुंतवणुक केली होती. या पेमेंटनंतर त्याने त्यांना लवकरच एक करार करण्याचे आश्वासन दिले, मात्र त्यांनी करार केला नाही. डिसेंबर 2024 पासून त्याने दरमाह परतावा रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र त्याने त्यांना गुंतवणुकीवर कुठलाही परतावा दिला नाही. सुहेलसोबतचा व्यवहार न पटल्याने त्यांनी त्याच्याकडे गुंतवणुक केलेल्या रक्कमेची मागणी सुरु केली होती. यावेळी त्याने काही दिवसांत मूळ रक्कमेसह व्याजाची रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले, मात्र त्याने त्याचे आश्वासन पाळले नाही. नंतर त्याने त्यांना प्रतिसाद देणे बंद केले. त्याचा मोबाईल बंद ठेवला होता.

फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बांगुरनगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी सुहेल शेख याच्याविरुद्ध गुंतवणुकीच्या सुमारे तीस लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून याच प्रकरणात सुहेलची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page