दान करण्याच्या बहाण्याने फसवणुक करणारा भामटा गजाआड

नऊ वर्ष होता फरार; चौदा गुन्हे दाखल तर तीस गुन्ह्यांची उकल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
25 फेब्रुवारी 2026
मुंबई, – दान करण्याचा बहाणा करुन पादचार्‍यांना विशेषता वयोवृद्धांची फसवणुक करणार्‍या एका रेकॉर्डवरील भामट्याला अंधेरी पोलिसांनी अटक केली. वसीम अब्बास सिराज ऊर्फ वसीम जाफरी ऊर्फ वसीम इराणी असे या भामट्याचे नाव असून गेल्या नऊ वर्षांपसून तो सतत पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. वसीमविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात चौदा गुन्हे दाखल असून त्याच्या अटकेने तीसहून अधिक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते.

यातील तक्रारदार अंधेरी येथे राहत असून 8 फेब्रुवारीला ते कामासाठी बाहेर आले होते. दुपारी अडीच वाजता त्यांना एका अज्ञात व्यक्तीने तिथे मशिद आहे का याबाबत विचारणा केली होती. त्याने एक ज्वेलर्स दुकान सुरु असून त्यासाठी त्याला मशिदीत दान करायचे आहे असे सांगितले. त्यानंतर त्याने पाचशे रुपयांच्या दोन नोटा काढून त्यांच्या सोन्याच्या चैनमध्ये लावण्यास सांगितले. ही चैन नोटांमध्ये गुंडाळण्याचा प्रयत्न करुन त्याने त्यांची एक तोळ्याची सोन्याची चैन घेऊन पलायन केले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी अंधेरी पोलिसांना हा प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

गेल्या काही वर्षांत अशा प्रकारच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे या गुन्ह्यांतील आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गजानन पवार, पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर परकाळे, समाधान सुपे, पोलीस हवालदार कांबळे, पुजारी, घडवले, शिंदे, पाटील, पोलीस शिपाई म्हात्रे, शिंदे, गवळी, लोंढे, पाटील, टरके तिघोटे, घुले, नरवट, मोरे, विशाल पिसाळ यांनी तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजवरुन पोलिसांना वसीमची ओळख पटली होती. त्यामुळे त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता.

ही शोधमोहीम सुरु असताना वसीमला कल्याण येथील अडीवली परिसरातून या पथकाने शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीत वसीम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून सध्या तो कल्याण अडीवली, गणेश चौकजवळील ब्राईट इमारतीमध्ये राहतो. मंदिर-मशिदीत दान करायचे आहे असे सांगून तो वयोवृद्धांना टार्गेट करत होता. त्यानंतर त्यांच्याकडील सोन्याचे दागिने चोरी करुन तो पळून जात होता. त्याच्याकडून गुन्ह्यांतील एक तोळ्याची चैन पोलिसांनी हस्तगत केली आहे.

त्याच्याविरुद्ध मुंबईसह महाराष्ट्र, सुरत, तेलंगणाच्या वाकोला, मानगाव, पोलादपूर, कर्जत, पहाडी शरीफ, शिवाजीनगर, टिळकनगर, सुरत गुन्हे शाखा, भुसावळ, मुंब्रा, कासारवडवली, महिदरपुरा पोलीस ठाण्यात रॉबरी, फसवणुक, गंभीर दुखापत करुन लुटमार करणे अशा चौदाहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. जामिनावर बाहेर आल्यानंतर तो पळून गेला होता. गेल्या नऊ वर्षांपासून तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता. या कालावधीत त्याने इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुन्हे केले आहेत.

त्याच्या अटकेने जोगेश्वरी, दहिसर, एमआयडीसी, ट्रॉम्बे, अंधेरी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक, वर्सोवा, विलेपार्ले पोलीस ठाण्यातील प्रत्येकी दोन, वनराई पोलीस ठाण्यातील तीन, दिडोंशी पोलीस ठाण्यातील चार, कुरार पोलीस ठाण्यातील सहा, मेघवाडी पोलीस ठाण्यातील सात अशा तीसहून अधिक अपहार, फसवणुक, रॉबरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडीतून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्याचा ताबा इतर पोलिसांकडे सोपविण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page