आयपीओमध्ये गुंतवणुकीच्या नावाने व्यावसायिकाची फसवणुक

39 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी अज्ञात ठगाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 फेब्रुवारी 2026
मुंबई, – चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून शेअरसह आयपीओमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देऊन एका वयोवृद्ध व्यावसायिकाची सुमारे 39 लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार दादर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मध्य प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून अज्ञात सायबर ठगांचा शोध सुरु केला आहे.

व्यवसायाने व्यापारी असलेले वयोवृद्ध तक्रारदार सुरेश विलेजी निसार हे त्यांया पत्नी आणि मुलासोबत दादर येथे राहतात. पूर्वी ते दादरच्या टी टी टेक्सटाईलमध्ये काम करत होते. त्यांचा एक गाळा असून तो गाळा त्यांनी भाड्याने दिला आहे. 15 डिसेंबर 2025 रोजी त्यांना मनी कंट्रोल या संकेतस्थळावर स्टोको कंपनीची एक जाहिरात दिसली होती. काही दिवसांनी त्यांना स्वाती वर्मा नावाच्या एका महिलेने कॉल करुन ती स्टोको कंपनीची प्रतिनिधी असल्याचे सांगितले. त्यांच्या कंपनीच्या आयपीओमध्ये सवलतीच्या दरात गुंतवणुक केल्यास त्यांना दरमाह दोन ते तीन पट परतावा मिळेल असे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता.

तिच्यावर विश्वास ठेवून त्यांनी आयपीओमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. 30 डिसेंबर 2025 ते 17 फेब्रुवारी 2026 या काावधीत त्यांनी तिला आरटीजीएसद्वारे गुंतवणुकीसाठी 39 लाख 16 हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. मात्र या गुंतवणुकीवर तिने त्यांना कुठलाही परतावा दिला नाही. याबाबत स्वाती वर्माकडे विचारणा केली असता तिला कोणतीही रक्कम मिळाली नसल्याचे सांगितले. त्यानंतर तिने त्यांच्या वैयक्तिक संपत्तीबाबत विचारणा करुन आयपीओमध्ये किमान दिड कोटीची गुंतवणुक करावी लागत असल्याचे सांगितले.

मात्र त्यांच्याकडे दिड कोटी रुपये नसल्याने त्यांनी आणखीन गुंतवणुक करण्यास नकार दिला होता. त्यानंतर तिने त्यांना प्रतिसाद देणे बंद केला. ती त्यांचे कॉल घेत नव्हती. शेअरसह आयपीओ खरेदीच्या नावाने तिने त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर हेल्पलाईन 1930 क्रमांकावर संपर्क साधून तिथे तक्रार केली होती. त्यानंतर त्यांनी मध्य प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर स्वाती वर्मासह तिच्या सहकार्‍याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page