हॉटेल व्यवसायातील गुंतवणुकीच्या आमिषाने सोळाजणांची फसवणुक
१.६० कोटीच्या फसवणुकीप्रकरणी व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१८ एप्रिल २०२४
मुंबई, – हॉटेल व्यवसायातील गुंतवणुकीवर आकर्षक व्याजदर देण्याचे आमिष दाखवून एका हॉटेल व्यावसायिकाने सोळाजणांची एक कोटी साठ लाख रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार जोगेश्वरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन पळून गेलेला हॉटेल व्यावसायिक सलमान याकूब घडिया याचा ओशिवरा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या गुन्ह्यांचा संमातर तपास गुन्हे शाखेकडून सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिकेत कामाला असलेले मोहम्मद सलीम राहत हुसैन खान हे माहीम येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. सध्या ते विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयातात वरिष्ठ नोंदणी सहाय्यक म्हणून काम करतात. तीन वर्षांच्या त्यांच्या परिचित नातेवाईकांनी त्यांची ओळख सलमान घडिया याच्याशी करुन दिली होती. सलमान हा जोगेश्वरी येथे राहत असून त्याने कॅफे राजस्थान नावाचे एक हॉटेल भाड्याने चालविण्यासाठी घेतले होते. हॉटेल व्यवसाय वाढीसाठी त्याला काही गुंतवणुकदाराची गरज होती. या गुंतवणुकीवर त्याने त्यांना आकर्षक व्याज देण्याचे आमिष दाखविले होते. त्यामुळे मोहम्मद सलीमने त्याच्या व्यवसायात आधी दहा लाख आणि काही महिन्यानंतर पुन्हा दहा लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीनंतर त्याने त्यांना काही महिने व्याजाची रक्कम दिली होती. फेब्रुवारी २०२३ रोजी त्यांन पैशांची गरज होती. त्यामुळे त्याने सलमानकडे काही रक्कम परत करण्याची विनंती केली. यावेळी त्याने त्यांना चार लाख रुपये परत केले होते. मात्र त्यानंतर त्याने त्यांना गुंतवणुकीवर व्याजाची रक्कम देणे बंद केले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्याच्याकडे उर्वरित पैशांची मागणी केली होती. मात्र वारंवार मागणी करुनही त्याने त्यांना पैसे दिले नाही. त्याने दिलेला पाच लाखांचा धनादेश बँकेत न वटता परत आला होता. मे २०२३ रोजी त्यांनी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा मोबाईल बंद येत होता. त्याचा त्याच्या राहत्या घरासह हॉटेलमध्ये शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. हॉटेल बंद करुन सलमान हा पळून गेल्याचे लक्षात येताच त्यांना धक्काच बसला होता. बुधवारी १७ एप्रिलला ते ओशिवरा पोलीस ठाण्यात गेले होते. यावेळी तिथे इतर पंधरा लोक होते. चौकशीदरम्यान सलमानने त्यांनाही हॉटेल व्यवसायात गुंतवणुकीस प्रवृत्त करुन त्यांच्याकडून १ कोटी ४६ लाख रुपये घेतले होते. या सर्वांना ठराविक महिने व्याजाची रक्कम दिल्यानंतर त्याने व्याजाची रक्कम देणे बंद केले होते. तो त्यांच्या संपर्कात नव्हता.
अशा प्रकारे मे २०२१ ते एप्रिल २०२४ या कालावधीत सलमानने हॉटेल व्यवसायासाठी पंधराजणांकडून गुंतवणुकीसाठी १ कोटी ६० लाख ६५ हजार रुपये घेतले, मात्र ही रक्कम परत न करता त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांच्या वतीने मोहम्मद सलीम खान यांनी ओशिवरा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सलमानविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. फसवणुक झालेल्यांमध्ये नासीस बुटवाल बावीस लाख, इम्रान सुल्तान डेरेया व त्याचा भाऊ याच्याकडून तीस लाख, मोहम्मद आसिफ अब्दुल सत्तार घोरी ५ लाख, मोहम्मद रफिक कुरेशी ४ लाख १५ हजार, सुजाउद्दीन सय्यद पाच लाख, कैसर सल्लाउद्दीन अठरा लाख, गाजी सय्यद साडेसात लाख, सर्फराज शेख दहा लाख, मोहम्मद फत्तेमोहम्मद पंधरा लाख, मुस्तफा सुमरा पाच लाख, जावेद पटेल चार लाख, फजल शेख पाच लाख, संजय जगदंबिका प्रसाद श्रीवास्ताव सहा लाख, झाकीस हुसैन शेख आणि सफिया अफजल कुरेशी दहा लाख रुपयांचा समावेश आहे. सलमानने अशाच प्रकारे इतर काही लोकांकडून पैसे घेतल्याचे तपासात उघडकीस आले असून फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सलमानकडून फसवणुक झालेल्या लोकांनी ओशिवरा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.