स्पोटर्स बाईकची चोरी करणार्या टोळीचा पर्दाफाश
24 लाखांच्या चोरीच्या अकरा बाईकसह रेकॉर्डरील गुन्हेगारांना अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 फेब्रुवारी 2026
मुंबई, – मुंबई शहरात पार्क केलेल्या महागड्या स्पोटर्स बाईकची चोरी करणार्या एका टोळीचा साकिनाका पोलिसांनी पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे 24 लाखांच्या अकरा चोरीच्या स्पोटर्स बाईक जप्त केल्या आहेत. मिराज ऊर्फ बवाल मोहम्मद रईस खान आणि उमेर आमीन शेख अशी या दोघांची नावे असून ते दोघेही धुळे आणि उत्तरप्रदेशचे रविहाशी आहेत. या दोघांच्या अटकेने पंधराहून अधिक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर दोघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
22 नोव्हेबर 2025 रोजी अंधेरीतील घाटकोपर-साकिनाका लिंक रोड, बिलाल मशिदीजवळील सोसायटीसमोर पार्क केलेी एक रॉयल इनफिल्ड कंपनीची महागडी स्पोटर्स बाईक चोरीस गेली होती. हा प्रकार दुसर्या दिवशी तक्रारदाराच्या लक्षात येताच त्याने साकिनाका पोलीस ठाण्यात बाईक चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. गेल्या काही वर्षांत बाईक चोरीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला अशा आरोपीविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर साकिनाका पोलिसांच्या विशेष पथकाने सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने बाईक चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता.
ही माहिती काढताना या गुन्ह्यांतील काही आरोपी ठाकूरपाडा, किरवली व्हिलेज, दहिसर नाका, दहिसर मोरी आणि ठाणे परिसरात येत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजीतसिंह दहिया, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप मैराळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल यादव, पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन चोरी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रविण शिरसाट, राजेंद्र नांगरे, सुहास कांदे, अजीत लोणकर, पोलीस हवालदार गांजाळे, पवार, सौदरमल, भिंगावडे, पोलीस शिपाई जाधव, अर्जुन, थोरात, ढगे, बागलाने, तांत्रिक् मदत करणारे पोलीस हवालदार विशाल पिसाळ यांनी या परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती.
याच दरम्यान तिथे आलेल्या मिराज खान आणि उमेर शेख या दोघांना पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच तक्रारदाराची बाईक चोरी केल्याची कबुली दिली. या बाईकसह त्यांनी इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दहा बाईक चोरी केल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांच्याकडून चोरी केलेल्या अकरा स्पोटर्स बाईक पोलिसांनी जप्त केल्या असून त्याची किंमत 23 लाख 89 हजार रुपये इतकी आहे. यातील मिराज हा मूळचा उत्तरप्रदेशच्या संत कबीर नगर, खालिलाबादचा रहिवाशी असून सध्या तो दहिसर, दहिसर नाका परिसरात राहतो तर उमेर हा धुळ्याचा गुगर कंपाऊडचा रहिवाशी आहे.
ते दोघेही दिवसा रेकी करुन रात्रीच्या वेळेस महागड्या स्पोटर्स बाईकची विक्री करत होते. या बाईकची स्वस्तात विक्री करुन ते दोघेही मौजमजा करत होते. त्यांच्या अटकेने पंधराहून अधिक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहेत. त्यातील दहा गुन्हे साकिनाका तर पाच गुन्हे कुर्ला, सायन, धारावी आणि विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. अटकेनंतर या दोघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांचा ताबा लवकरच इतर पोलीस ठाण्यांना दिला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.