मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
1 मार्च 2026
मुंबई, – नागपाडा येथे अकरा वर्षांच्या मुलीवर तिच्याच सावत्र पित्याने तर मालाडच्या मालवण परिसरात तेरा वर्षांच्या मुलीवर नातेवाईकाने लैगिंक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नागपाडा आणि मालवणी पोलिसांनी दोन स्वतंत्र लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. या दोन्ही गुन्ह्यांतील आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अटकेनंतर या दोघांनाही विशेष पोक्सो कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
27 वर्षांची तक्रारदार महिला ही नागपाड्यातील कामाठीपुरा परिसरात राहत असून ती वेश्याव्यवसाय करते. 30 वर्षांचा आरोपी तिचा पती असून तो तिच्यासोबत राहतो. या महिलेची अकरा वर्षांची मुलगीे आहे. गुरुवारी दुपारी सव्वातीन वाजता आरोपीने राहत्या घरीच पिडीत मुलीशी अश्लील चाळे तिच्यावर लैगिंक अत्याचार केला होता. या प्रकारानंतर ही मुलगी प्रचंड घाबरली होती. घाबरलेल्या मुलीला पाहिल्यानंतर तिच्या आईने तिची विचारपूस केली होती. यावेळी तिच्याकडून तिला घडलेला प्रकार समजला होता. या घटनेनंतर तिने नागपाडा पोलिसांत तिच्या पतीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीस पोलिसांनी अटक केली. पिडीत मुलीसह आरोपीची लवकरच मेडीकल होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दुसरी घटना मालाडच्या मालवणी परिसरात घडली. 47 वर्षांची तक्रारदार महिला ही मालाडच्या मार्वे रोडवर तिच्या कुटुंबियांसोबत राहत असून तिचा मासे विक्रीचा व्यवसाय आहे. तेरा वर्षाची पिडीत तिची मुलगी आहे. आरोपी हा त्यांचा नातेवाईक असून त्याचा मालवणी परिसरात प्लॉट खरेदी-विक्रीचे एक कार्यालय आहे. जानेवारी महिन्यांत त्याने पिडीत मुलीला खाऊ खाण्यासाठी शंभर रुपये देतो असे सांगून त्याख्या कार्यालयात बोलाविले होते. तिथे गेल्यानंतर त्याने तिच्याशी जवळीक साधून लगट करण्याचा प्रयत्न केला. तिच्या छातीला नकोसा स्पर्श करुन तिच्या गुप्त भागांवर अश्लील चाळे केले होत. त्यानंतर त्याने त्याच्या मित्राच्या रुममध्येच अशाच प्रकारे लैगिंक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणाला सांगू नकोस असे सांगून त्याने तिच्या आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली होती.
हा प्रकार अलीकडेच या मुलीकडून तिच्या तक्रारदार आईला समजला होता. ही माहिती ऐकून तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर तिने मालवणी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून आरोपी नातेवाईकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचारासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर दोन्ही आरोपींना विशेष पोक्सो कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली.