जामिनावर बाहेर आल्यानंतर फरार झालेल्या तीन आरोपींना अटक
आरोपींवर लैगिंक अत्याचारासह फसवणुकीचे गुन्हे दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 मार्च 2026
मुंबई, – लैगिंक अत्याचारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांत जामिनावर बाहेर आल्यानंतर फरार झालेल्या तीन आरोपींना एन. एम जोशी मार्ग आणि आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली. रविकांत ऊर्फ रवी सखाराम नेरुरकर, संतोष नामदेव शिर्के आणि गणेश भिमय्या विमुला अशी या तिघांची नावे असून यातील गणेशविरुद्ध सरकारी कर्मचार्याला शासकीय कामापासून परावृत्त करणे, रविकांतवर लैगिंक अत्याचार तर संतोषविरुद्ध बोगस दस्तावेज सादर करुन फसवणुक करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत जामिनावर बाहेर आल्यानंतर गणेश हा 38, रविकांत 31 तर संतोष हा 29 वर्षांपासून फरार होते, अखेर या तिघांना पुन्हा अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर तिन्ही आरोपींना विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते.
गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या कोर्टात सुरु असलेल्या खटल्यात काही आरोपी सुनावणीसाठी हजर राहत नव्हते. जामिनावर बाहेर आल्यानंतर संबंधित आरोपी पळून गेले होते. अशा आरोपीविरुद्ध कोर्टाने अजामिनपात्र वॉरंट आणि जामिनपात्र वॉरंट बजाविले होते. तसेच या आरोपींच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांना विशेष मोहीम घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत अशा आरोपींची एक यादी काढण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना दिले होते. त्यात परिमंडळ तीनतंर्गत विविध पोलीस ठाण्यता 59 आरोपीविरुद्ध जामिनपात्र तर 79 आरोपीविरुद्ध अजामिनपात्र वॉरंट बजाविण्यात आल्याचे उघडकीस आले होते.
यातील बहुतांश आरोपी गेल्या 29 वर्षांपासून फरार होते. त्यामुळे या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना गणेश विमुला आणि संतोष शिर्के या दोन आरोपींना एन. एम जोशी मार्ग पोलिसांनी तर रविकांत नेरुरकर या आरोपीस आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली. यातील गणेशविरुद्ध 1987 साली शासकीय अधिकार्याला शासकीय कामापासून परावृत्त करणे, संतोष शिर्के याच्याविरुद्ध 1997 साली बोगस दस्तावेज सादर करुन फसवणुक करणे तर रविकांतविरुद्ध 1995 साली लैगिंक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याच गुन्ह्यांत नंतर त्यांना जामिनावर सोडून देण्यात आले होते. मात्र जामिनावर बाहेर येताच ते तिघेही पळून गेले होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कोर्टाने जामिनपात्र-अजामिनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यांचा शोध सुरु असातना गणेशला 38, रविकांतला 31 तर संतोषला 29 वर्षांनी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या तिघांनाही विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते.