आयसिसच्या संशयित तीन तरुणांच्या घरी एटीएसची कारवाई

मोबाईल, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आदी महत्त्वाचे पुरावे ताब्यात

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 मार्च 2026
मुंबई, – भारतात बंदी घातलेल्या इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सिरिया या आयसीस संघटनेसाठी छुप्या पद्धतीने प्रचारासह अन्य कारवायामध्ये सहभाग असलेल्या तीन संशयित तरुणांच्या कुर्ला आणि गोवंडीतील शिवाजीनगर परिसरातील राहत्या घरी सोमवारी महाराष्ट्र एटीएसने एकाच वेळेस कारवाई केली होती. या कारवाईत तीन संशयित तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांच्यासह त्यांच्या घरातून मोबाईल, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहे. त्यांच्या चौकशीसह जप्त मुद्देमालामुळे एटीएसला काही महत्त्वाचे पुरावे प्राप्त झाले आहेत. त्यांच्या चौकशीतून आयसीसच्या संपूर्ण नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात लवकरच एटीएसला यश येणार आहे. या संपूर्ण गुन्ह्यांचा तपास विक्रोळी एटीएसकडून सुरु आहे.

भारतात इस्लामिक स्टेट ऑफ इराक सिरिया या आयसीस संघटनेवर बंदी आहेत. तरीही या संघटनेसाठी मुंबईसह पुणे आणि इतर शहरात अनेक तरुण काम करत होते. यापूर्वी एटीएसने अशाच काही तरुणांवर कारवाई केली होती. ही कारवाई सुरु असताना मुंबई शहरात आयसीसचे एक युनिट पुन्हा सक्रिय झाले आहे. या युनिटमधील काही तरुण संघटनेसाठी काम करताना त्यांना अत्यंत गोपनीय माहिती पुरवत असल्याची माहिती महाराष्ट्र एसटीएसला मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने गोवंडी आणि कुर्ला परिसरात काही दिवसांपासून आपले लक्ष केंद्रीत केले होते. सोमवारी कुर्ला आणि गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात एकाच वेळेस तीन घरांवर पोलिसांनी कारवाई केली.

या कारवाईत पोलिसांनी तीन संशयित तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून मोबाईल, लॅपटॉप तसेच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे ताब्यात घेतले होते. जप्त सर्व मुद्देमाल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आला आहे. या तरुणांच्या चौकशीत ते आयसीसच्या संपर्कात असल्याचे काही पुरावे सापडले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु होती. याबाबत काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांना प्राप्त झाले आहे. संबंधित तिन्ही तरुण आयसीससाठी डिजीटल प्लॅटफॉर्मवरकट्टरपंथी सामग्रीचा प्रसार करत होते. ते काही संशयित व्यक्तींच्या संपर्कात होते. त्यांच्याकडून त्यांना आर्थिक मदत केली जात होती.

या तिघांच्या त्यांच्या चौकशीत इतर काही संशयितांची नावे असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या चौकशीचा तपशील समजू शकला नाही. या कारवाईबाबत अधिकृत तपशील सांगण्यास पोलिसांनी नकार दिला असून विक्रोळी एटीएसकडून या संपूर्ण गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page