होळी-रंगपंचमीनिमित्त स्थानिक पोलिसांसह वाहतूक पोलिसांची मोहीम
159 मद्यपी, 4317 विनाहेल्मेट तर 530 ट्रिपल सीट चालकांवर कारवाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 मार्च 2026
मुंबई, – होळी आणि रंगपंचमीनिमित्त शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलिीसांनी सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला असतानाच स्थानिक पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लघंन करणार्या वाहनचालकांना चांगलाच दणका दिला. 2 मार्च आणि 3 मार्च या दोन दिवसांत 159 मद्यपी, 4 हजार 317 विनाहेल्मेट तर 530 ट्रिपल सीट चालकावर पोलिसांनी कारवाई केली. यावेळी विविध वाहतूक नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी 16 हजार 727 चालकाविरुद्ध कारवाई करुन त्यांच्याकडून 1 कोटी 99 लाख 91 हजार 650 रुपयांचा दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
होळी आणि रंगपंचमीनिमित्त शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये तसेच या सणाला कुठेही गालबोट लागू नये म्हणून पोलिसांनी जय्यत तयारी केली होती. अनेकदा होळी आणि रंगपंचमीला काही वाहनचालक मद्यप्राशन करुन वाहन चालवतात. जेणेकरुन अपघाताच्या घटना घडतात. अशा घटनांना रोखण्यासाठी तसेच वाहतूक नियमांचे उल्लघंन करणार्या वाहनचालकाविरुद्ध स्थानिक पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यासाठी संपूर्ण शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोमवारी 2 मार्च आणि मंगळवारी 3 मार्च या दोन दिवसांत शहरात अतिरिक्त पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, दोन हजार पोलीस अधिकारी, नऊ हजार पोलीस अंमलदार असा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर महत्त्वाच्या ठिकाणी एसआरपीएफ प्लाटून, क्यूआरटी टिम, बीडीडीएस टिम, होमगार्डस आदींना मदतीसाठी ठेवण्यात आले आहे.
पोलीस दलातर्फे ठिकठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते. गर्दीच्या ठिकाणी गस्त आणि फिक्स पॉईट बंदोबस्त नेमण्यात आले होते. वाहतूक नियमांचे उल्लघंन व ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह विरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली होती. 2 मार्च आणि 3 मार्च या दोन्ही दिवसांत स्थानिक पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह कारवाईत 159 मद्यपी चालकावर कारवाई केली. विनाहेल्मेट बाईक चालविणे 4 हजार 317, वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्या 2 हजार 532 वाहन, सिंग्नल तोडणे 610, लायसन्सशिवाय वाहन चालविणे 431, ट्रिपल सीट 530, वन वेमध्ये प्रवेश करणे 278, हॉकिंग 2, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे 20, भरवेगात वाहन चालविणे 4 हजार 486 तसेच इतर कारवाईत 2 हजार 603 वाहनचालकावर कारवाई केली होती.
एकूण 16 हजार 727 प्रकरणात पोलिसांनी 1 कोटी 99 लाख 91 हजार 650 रुपयांचा दंडात्मक कारवाई केली होती. या सर्वांविरुद्ध वाहतूक पोलीस कायद्याच्या विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली होती. गेल्या वर्षी 17 हजार 495 वाहनचालकाविरुद्ध विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली होती. हीच संख्या यंदा 16 हजार 727 इतकी होती. गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा कमी वाहतूक नियमांचे गुन्हे दाखल आहेत.