डंपरची बाईकला धडक लागून सोळा वर्षांच्या मुलाचा मृत्यू

अपघातानंतर डंपरचालकाचे घटनास्थळाहून पलायन

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 मार्च 2026
मुंबई, – भरवेगात जाणार्‍या एका डंपरची धडक लागून एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. समर्थ श्रीकांत सरफरे असे या मृत मुलाचे नाव असून त्याच्या मृत्यूप्रकरणी आरोपी डंपरचालकाविरुद्ध रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर डंपरचालकाने घटनास्थळाहून पलायन केले होते. त्यामुळे त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

हा अपघात रविवारी 1 मार्चला रात्री साडेअकरा वाजता शिवडीतील कॉटनग्रीनच्या दिशेने जाणार्‍या फिटवेल हॉलसमोरील दक्षिण वाहिनीवर झाला. यश सुनिल शिंदे हा 19 वर्षांचा तरुण शिवडी येथे राहत असून सध्या तो कॉलेजमध्ये शिक्षण घेतो. रविवारी रात्री तो त्याचे काका विनोद दत्ताराम कातकर यांच्या बाईकमध्ये पेट्रोल नसल्याने पेट्रोल भरण्यासाठी शिवडीतील आचार्य दोंदे मार्ग, भारत पेट्रोल पंपाजवळ आला होता. मात्र पेट्रोल पंप बंद असल्याने सिताराम पलटुराम मार्ग येथे आला होता.

तिथे त्याला त्याचा मित्र समर्थ, राज विश्वास सुर्वे व अन्य एक मित्र भेटले. त्यानंतर ते चौघेही त्यांच्या बाईकवरुन जात होते. रात्री साडेअकरा वाजता ते कॉटनग्रीनच्या दिशेने जाणार्‍या फिटवेल हॉलसमोरील दक्षिण वाहिनीवरुन जात होते. यावेळी त्यांच्या बाजूने भरवेगात जाणार्‍या एका डंपरने त्यांच्या बाईकला जोरात धडक दिली होती. त्यामुळे त्यांची बाईक स्लीप झाली आणि ते दोघेही बाईकवरुन पडले होते. याच दरम्यान डंपरच्या चाकाखाली आल्याने समर्थ सरफरे हा गंभीररीत्या जखमी झाला होता.

अपघातानंतर डंपरचालक जखमी समर्थला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा अपघाताची माहिती पोलिसांना न देता पळून गेला होता. या घटनेनंतर यशने त्याच्या वडिलांसह काकांना फोनवरुन ही माहिती दिली. या माहितीनंतर ते दोघेही घटनास्थळी आले होते. जखमी झालेल्या समर्थला त्यांनी केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. अपघाताची माहिती मिळताच रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

याप्रकरणी यश शिंदे याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी चालकाविरुद्ध हलगर्जीपणाने डंपर चालवून एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. अपघातानंतर डंपरचालक पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page