निवासी इमारतीमध्ये चालणार्‍या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

वेश्यादलाल महिलेस अटक तर तीन तरुणींची सुटका

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 मार्च 2026
मुंबई, – मालाड परिसरातील एका निवासी इमारतीमध्ये चालणार्‍या सेक्स रॅकेटचा मालाड पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी फराह नावाच्या एका 38 वर्षांच्या वेश्यादलाल महिलेस पोलिसांनी अटक केली. तिच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि पिटा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर तिला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन तरुणींची सुटका केली असून मेडीकलनंतर या तिघींनाही कांदिवलीतील पोईसर येथील महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

फराह ही मालाडच्या मालवणी परिसरात राहत असून ती ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवते. तिच्या संपर्कात असलेल्या तरुणींना काही रक्कम मोबदला देऊन त्यांना वेगवेगळ्या ग्राहकांसोबत शारीरिक संबंधासाठी पाठवत असल्याची माहिती मालाड पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी एक बोगस ग्राहकाला तिला संपर्क साधण्यास सांगितले होते. ठरल्याप्रमाणे या बोगस ग्राहकाने तिला संपर्क साधून तिच्याकडे काही तरुणींची मागणी केली होती.

फोनवरुनच त्यांच्यात आर्थिक व्यवहार ठरला होता. त्यानंतर तिने बोगस ग्राहकाला मालाड येथील एका एसआरए इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरील रुममध्ये बोलाविले होते. ठरल्याप्रमाणे बोगस ग्राहक संबंधित रुममध्ये गेला होता. तिथे त्याला तीन तरुणी असल्याचे दिसून आले. तिथेच फराहसोबत आर्थिक व्यवहार सुरु असताना मालाड पोलिसांच्या एका विशेष पथकाने तिथे छापा टाकला होता. या कारवाईत फराहला पोलिसांनी ताब्यात घेतले. रुममधून पोलिसांनी तीन तरुणींची सुटका केली. चौकशीत या तिघींनाही फराहने तिथे वेगवेगळ्या पुरुषासोबत शारीरिक संबंधासाठी बोलाविले होते.

ग्राहकांसोबत शारीरिक संबंध ठेवल्यास त्यांना चांगला मोबदला देण्याचे तसेच पैशांचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यांच्या मदतीने ती ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवत असल्याचे उघडकीस आले होते. या कबुलीनंतर फराहला पोलिसांनी अटक केली. तिच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि पिटाच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर तिला सोमवारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे.

रुममधून सुटका केलेल्या तिन्ही तरुणींना नंतर मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. मेडीकलनंतर त्यांना पोईसर येथील महिला सुधारगृहात पाठविण्यात आले. फराहची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. ती कशीपासून सेक्स रॅकेट चालवत होती, याकामी तिला कोणी मदत करतो, तिच्या संपर्कात अजूनही किती तरुणी किंवा महिला आहेत याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page