सेल्फीसाठी विदेशी तरुणीचा पाठलाग करणारे बिहारी तरुण गजाआड

मुंबईसह बिहार येथे आग्रीपाडा पोलिसांची धडक कारवाई

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 मार्च 2026
मुंबई, – मुंबई शहरात आलेल्या एका विदेशी पर्यटक महिलेचा सेल्फीसाठी पाठलाग करुन तिच्याशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी दोन बिहारी तरुणांना आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली. गुलशनकुमार नरेश शर्मा आणि मनसुखकुमार चंदकिशोर शर्मा अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने बुधवार 4 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हा दाखल होताच गुलशनकुमारला मलबार हिल तर मनसुखकुमारला बिहारला त्याच्या गावाहून पोलिसांनी ताब्यात घेतले होते, चौकशीत या दोघांनी विदेशी महिलेचा पाठलाग करुन सेल्फीसाठी तिच्याशी असभ्य वर्तन केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

यूट्यबर असलेली इनेस फारिया ही विदेशी महिला गेल्या दोन महिन्यांपासून भारतात वास्तव्यास आहे. काही दिवसांपूर्वी ती दक्षिण मुंबईत फिरण्यासाठी आली होती. तेथून ती महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळील धोबीघाट, सातरस्त परिसरात आली होती. यावेळी तिचा दोन तरुणांनी पाठलाग केला. तिच्यासोबत त्यांना एक सेल्फी काढायचा होता, मात्र तिने नकार देऊनही ते दोघेही तिचा पाठलाग करत होते. तिच्याशी गैरवर्तन करत होते. जवळपास पंधरा ते वीस मिनिटे ते दोघेही तिचा पाठलाग करुन तिच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी दबाव आणत होते, मात्र तिने त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यास स्पष्टपणे नकार दिला होता.

घडलेल्या प्रकाराने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे तिने सोशल मिडीयावर तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगाचा एक व्हिडीओ शेअर करताना एक मॅसेज दिला होता. त्यात तिने भारतात तिला दोन महिन्यांत अनेकदा चांगला अनुभव आला, मात्र दक्षिण मुंबईत घडलेल्या या प्रकाराने तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. तो दिवस माझ्यासाठी वेगळा होता. ते दोन्ही तरुण तिच्यासोबत सेल्फीसाठी आग्रह करत होते, मात्र वारंवार नकार देऊन ते तिचा पाठलाग करत होते. अखेर त्यांना तिने दूर केले होते. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ व्हायरल होताच त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत झोन तीनच्या पोलीस उपायुक्तांना कारवाईचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर आग्रीपाडा पोलिसांनी संबंधित दोन्ही तरुणांविरुद्ध विविध भारतीय न्याय सहिता कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सोशल मिडीयावर या दोन्ही तरुणांचा फोटो व्हायरल झाला होता. त्यामुळे या फोटोवरुन आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. तपासात एक आरोपी मलबार हिल येथील एका बांधकाम साईटवर काम करत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या पथकाने गुलशनकुमार शर्मा या 20 वर्षांच्या तरुणाला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने मनसुखकुमारच्या मदतीने या विदेशी महिलेशी असभ्य वर्तन केल्याची कबुली दिली. या घटनेनंतर मनसुखकुमार हा बिहारला त्याच्या गावी पळून गेला होता. त्याच्या अटकेसाठी एक टिम बिहारला पाठविण्यात आली होती. या पथकाने मनसुखकुमारला रविवारी त्याच्या गावातून अटक करुन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणले होते. अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page