वयोवृद्ध शेअरब्रोकरला पाच कोटीच्या खंडणीसाठी धमकी
विदेशातून कॉल करणार्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
3 मार्च 2026
मुंबई, – मालाड येथे राहणार्या एका वयोवृद्ध शेअरब्रोकरला अज्ञात व्यक्तीने विदेशातून व्हाईस कॉल करुन पाच कोटीच्या खंडणीसाठी धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या काही दिवसांत विलेपार्ले, बोरिवली, अंधेरीतील काही व्यावसायिकांना लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या नावाने खंडणीसाठी धमकी आली होती, आता मालाड येथे शेअरब्रोकरला आलेल्या धमकीने मुंबईतील व्यापार्यासह व्यावसायिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान विदेातून कॉल करणार्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध मालाड पोलिसांनी खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा मालाड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.
62 वर्षांचे तक्रारदार व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मालाड परिसरात राहतात. ते शेअरब्रोकर म्हणूनही काम करतात. 22 फेब्रुवारीला ते त्यांच्या घरी होते. सायंकाळी सात वाजता त्यांना एका अज्ञात व्यक्तीने व्हॉटअप मॅसेज केला होता. या मॅसेजमध्ये त्यांच्याकडे अज्ञात व्यक्तीने पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. ही रक्कम दिली नाहीतर त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सुरुवातीला त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र दोन दिवसांनी म्हणजे 24 फेब्रुवारीला त्यांच्या मुलाला अज्ञात व्यक्तीने व्हॉटअप मॅसेजद्वारे धमकी दिली होती.
या धमकीत या व्यक्तीने त्याच्याकडे पुन्हा पाच कोटी रुपयांची मागणी केली होती. पैसे तयार ठेवा नाहीतर त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीचे मॅसेज आणि व्हाईस रेकॉडिंग त्यांनी सेव्ह करुन ठेवले होते. दोन दिवसांत दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यासह त्यांच्या मुलाकडे पाच कोटीची मागणी केली होती. पैसे दिले नाहीतर त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना तसेच नातेवाईकांना जिवे मारण्याची धमकी दिली होती.
भयभीत झालेल्या वयोवृद्ध शेअरब्रोकरने मालाड पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांना आलेले मॅसेज आणि व्हाईस रेकॉडिंग दिले होते. त्यांच्या जबानीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खंडणीसह धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या धमकीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला संमातर तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून विदेशी कॉलवरुन मुंबई शहरातील एका व्यावसायिक, व्यापार्यांना खंडणीसाठी धमकी दिली जात आहे. यापूर्वी विलेपार्ले, बोरिवली आणि अंधेरीतील तीन व्यावसायिक आणि व्यापार्यांना लॉरेन्स बिष्णोईच्या नावाने खंडणीसाठी धमकी दिली होती. या धमकीनंतर गुन्हा दाखल होताच विलेपार्ले आणि बोरिवली पोलिसांनी काही आरोपींना अटक केली होती. या आरोपींनी खंडणीसाठी लॉरेन्स बिष्णोईच्या नावाचा वापर केल्याची कबुली दिली होती. आता मालाडच्या शेअरब्रोकरला विदेशातून खंडणीसाठी धमकी आल्याने शहरातील व्यापारी वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.