दारु सांडली म्हणून तरुणाची लाथ्याबुक्यांनी मारहाण करुन हत्या

हत्येचा गुन्हा दाखल होताच तीन बंधूंसह पाचजणांना अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
4 मार्च 2026
मुंबई, – चालताना धक्का लागून दारु सांडली म्हणून रागाच्या भरात तुषार सुनिल उजैनवाल या तरुणाची पाचजणांच्या एका टोळीने हाताने तसेच लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण करुन हत्या केल्याची घटना वडाळा परिसरात घडली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच तीन आरोपी बंधूंसह पाचही आरोपींना वडाळा टी टी पोलिसांनी अटक केली. संतोष बाबूलाल यादव, सुरेश बाबूलाल यादव, गणेश बाबूलाल यादव, करण किसन सोनार आणि रोहित जगपाल जिनवाल अशी या पाचजणांची नावे आहेत. हत्येच्या याच गुन्ह्यांत त्यांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही घटना मंगळवारी 3 मार्चला दुपारी साडेतीन वाजता वडाळा येथील कोकरी आगार, आंबेडकर नगर रोड, सार्वजनिक वाचनालयसमोर घडली. रोहित सुनिल उजैनवाल हा तरुण अ‍ॅण्टॉप हिल येथे राहत असून प्लंबर म्हणून काम करतो. मृत तुषार हा त्याचा भाऊ आहे. पाचही आरोपी याच परिसरात राहत असून एकमेकांच्या परिचयाचे आहेत. मंगळवारी धुलिवंदन असल्याने परिसरातील काही तरुण आंबेडकर नगर रोड, सार्वजनिक वाचनालयासमोर एकमेकांना रंग लावत होते. यावेळी तिथे संतोष यादव आणि रोहित जिनवाल हे मद्यप्राशन करत होते. त्यांना तुषार आणि त्याचा मित्र रोहन यांचा धक्का लागला होता. त्यामुळे त्यांची दारु जमिनीवर सांडली होती. त्याचा राग आल्याने या दोघांनी त्यांना शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली होती.

याच दरम्यान तिथे इतर तीनजण आले आणि त्यांनीही तुषारला हाताने तसेच लाथ्याबुक्यांनी मारहाण केली होती. या मारहाणीत तुषार हा बेशुद्ध झाला होता. या हल्ल्यानंतर पाचही आरोपी तेथून पळून गेले होते. बेशुद्धावस्थेत तुषारला स्थानिक रहिवाशांनी तातडीने सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला होता. ही माहिती मिळताच वडाळा टी टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी रोहितच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पाचही आरोपीविरुद्ध हत्येसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या संतोष यादव, सुरेश यादव आणि गणेश यादव या तीन आरोपी बंधूसह करण सोनार आणि रोहित जिनवाल अशा पाचजणांना पोलिसांनी अटक केली. यातील रोहित हा चालक असून त्याच्याविरुद्ध एनडीपीएसचा एक गुन्हा दाखल आहे. अटकेनंतर या पाचही आरोपींना बुधवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. दारु सांडल्याने आरोपींनी तुषारची लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण करुन हत्या केल्याने परिसरात धुलिवंदनला गालबोट लागले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page