अपंगाचा डब्ब्यातून प्रवास करुन महिलांचे दागिने पळविणारा अटकेत

पाच गुन्ह्यांची उकल करुन आठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
4 मार्च 2026
मुंबई, – अपंगाच्या डब्ब्यातून प्रवास करुन महिलांचे सोन्याचे दागिने पळविणार्‍या एका आरोपीस दादर गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. परवेज अब्दुल अहाद खान असे या 29 वर्षीय आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी आहे. त्याच्या अटकेने पाच सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांतील सुमारे आठ लाखांचे चोरीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. परवेज हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

किर्तीमाला वराडकर ही 60 वर्षांची महिला तिच्या पतीसोबत 29 जानेवारी 2026 रोजी रात्री पावणेनऊ वाजता सीएसएमटी स्लो लोकलमधून अपंगाच्या डब्ब्यातून प्रवास करत होती. ही लोकल परळ-करीरोड रेल्वे स्थानकादरम्यान धीम्या गतीने जात असताना अपंगाच्या डब्ब्यातून प्रवास करणार्‍या एका अज्ञात व्यक्तीने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून चालत्या लोकलमधून उडी मारली होती. त्यानंतर तो अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला होता. ही लोकल दादर रेल्वे स्थानकात येताच तिने दादर रेल्वे पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी 304 (2) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

गेल्या काही दिवसांत अपंगाच्या डब्ब्यातून प्रवास करुन बाजूच्या महिला डब्ब्यातून प्रवास करणार्‍या महिलांच्या अंगावरील दागिने चोरी होण्याच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. याबाबत काही तक्रारी रेल्वे पोलीस ठाण्यात प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर, पोलीस उपायुक्त प्रज्ञा जेडगे यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस उपायुक्त प्रज्ञा जेडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र रानमाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश भडाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश हरिश्चंद्रे, पोलीस हवालदार अजय रौंधळ, राकेश भामरे, प्रशांत साळुंके, रेडेकर, सुनिल मागाडे, महिला पोलीस हवालदार सानप, पोलीस शिपाई अक्षय देसाई, स्वप्निल नांगरे, अहिनवे यांनी तपास सुरु केला होता.

तपासात अशीच एक घटना बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. गुन्ह्यांची पद्धत आणि आरोपी एकच असल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्यामुळे या पथकाने रेल्वे स्थानकासह आजूबाजूच्या सीसीटिव्ही फुटेजची पाहणी करुन संशयित आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असातना या पथकाने परळ रेल्वे स्थानकात साध्या वेशात पाळत ठेवून परवेज खान याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. तो तोंडाला मास्क लावून अपंगाच्या डब्ब्यातून प्रवास करत होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला ताब्यात घेऊन दादर रेल्वे स्थानकात आणण्यात आले होते.

त्याची चौकशी केल्यानंतर त्यानेच दादर आणि बोरिवलीच्या हद्दीत दोन महिलांचे सोनसाखळी चोरी केल्याची कबुली दिली. परवेज हा मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी असून सध्या वडाळा येथे राहतो. त्याच्या अटकेने बोरिवली, दादर, डोबिवली, वाशी आणि ठाणे रेल्वे स्थानकातील पाच गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. या गुन्ह्यांतील सुमारे आठ लाखांचा चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page