भारत-इंग्लंड सामन्यांची ब्लॅकमध्ये तिकिट विक्रीचा पर्दाफाश
डॉकयॉर्ड रोड येथून 51 वर्षांच्या आरोपीस तिकिटासह अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 मार्च 2026
मुंबई, – मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील आंतरराष्ट्रीय टी 20 वर्ल्ड कप सामन्यांचे ब्लॅकमध्ये तिकिट विक्रीचा गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने पर्दाफाश केला. याप्रकरणी जहीर कमालुउद्दीन बामणे या 51 वर्षांच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून वानखेडे स्टेडियमच्या विविध पेव्हीलियनचे प्रत्येकी एक हजाराचे दहा तिकिट पोलिसांनी जप्त केले आहेत. एका तिकिटाची जहीर हा 25 हजारांमध्ये विक्री करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
डोंगरी परिसरात राहणारे जयेश रमेश अय्यर हे व्यावसायिक असून त्यांच्या मालकीचा एक फास्ट फुड विक्रीचा स्टॉल आहे. ते क्रिकेट शौकीन असून त्यांना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार्या भारत आणि इंग्लंड सामना पाहण्याची इच्छा होती. तिकिटबाबात विचारणा करत असताना त्यांना झहीर बामणे या व्यक्तीविषयी माहिती मिळाली होती. तो आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या सामन्याचे तिकिट विक्री करतो अशी माहिती मिळताच त्याने त्याला तिकिटबाबत विचारणा केली होती. यावेळी त्याने एका तिकिटाची किंमत 25 हजार रुपये असल्याचे सांगितले. तिकिटाच्या मूळ किंमतीपेक्षा ही रक्कम जास्त होती.
तो ब्लॅकमध्ये क्रिकेट सामन्याच्या तिकिटाची विक्री करत असल्याने त्याने ही माहिती गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाला दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी त्याला जहीरला पुन्हा कॉल करुन तिकिट घेऊन डॉकयार्ड रोड येथे बोलविण्यास सांगितले होते. त्यामुळे त्याने जहीरला कॉल करुन तिकिट घेऊन डॉकयॉर्ड रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेलजवळ बोलाविले होते. ठरल्याप्रमाणे तिथे जहीर हा भारत आणि इंग्लंड यांच्या सामन्यांची तिकिट घेऊन आला होता.
यावेळी त्याला खंडणीविरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईलसह आंतरराष्ट्रीय टी 20 वर्ल्ड कप सामन्याचे विविध पेव्हेलियनचे प्रत्येकी एक हजार रुपयांचे दहा तिकिटे जप्त केले. चौकशीत त्याने एक हजाराची तिकिट 25 हजारांमध्ये ब्लॅकमध्ये विक्री करत असल्याची कबुली दिली. जहीर हा डॉकयॉर्ड रोड येथील गनी इमारतीमध्ये राहत असून त्याने यापूर्वीही अशाच प्रकारे क्रिकेट सामन्यांच्या तिकिटांची ब्लॅकमध्ये विक्री केल्याचे बोलले जाते. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली.