गुंतवणुकीच्या आमिषाने दोन सिनेअभिनेत्रींसह चौघांची फसवणुक

बिल्ड व चित्रपट निर्माता असलेल्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 मार्च 2026
मुंबई, – मुंबईसह इतर ठिकाणी सुरु असलेल्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परतावा देतो असे सांगून दोन सिनेअभिनेत्रीसह चौघांची त्यांच्याच परिचित बिल्डर आणि चित्रपट निर्माता असलेल्या अविनाश गणेश जाधव याने सुमारे 47 लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिनेअभिनेत्री मृणालिनी सुभाष जांभळे हिच्या तक्रार अर्जावरुन शिवाजी पार्क पोलिसांनी अविनाश जाधवविरुद्ध फसवणुकीसह जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. फसवणुक झालेल्या वर्षा उसगावकर हिचाही समावेश असून तिने त्याच्या प्रोजेक्टमध्ये अकरा लाखांची गुंतवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

मृणालिनी सुभाष जांभळे ही सिनेअभिनेत्री असून ती सध्या दादर येथे राहते. गेल्या 22 वर्षांत तिने अनेक नाटक, टिव्ही मालिका तसेच मराठी चित्रपटात काम केले आहे. अविनाश जाधव हा तिच्या परिचित असून तो व्यवसायाने बिल्डर, डेव्हल्पर तसेच चित्रपट निर्माता आहे. त्याच्या आई मला मारु नका या चित्रपटात तिने काम केले आहे. त्यामुळे तिची त्याच्याशी चांगली मैत्री होती. ऑगस्ट 2019 रोजी अविनाश हा तिच्या घरी आला होता. त्याने त्याची पनवेल येथे अडीच कोटीची एक जमिन असून तिथे प्लाटिंगचे प्रोजेक्ट सुरु आहे. तसेच त्याचा उरण बाजारपेठ येथे बांधकाम सुरु आहे. या दोन्ही प्रोजेक्टसाठी त्याला चांगल्या गुंतवणुकदाराची गरज आहे.

त्याच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुक केल्यास तिला चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. हा प्रपोजल चांगला वाटल्याने मृणालिनी जांभळे हिने ही माहिती तिचा भाऊ सुभाष जांभळे, तिची सिनेअभिनेत्री मैत्रिण वर्षा उसगावकर (शर्मा), झीनल सुल्तान सय्यद यांना दिली होती. अविनाश हा नामांकित बिल्डर, डेव्हल्पर आणि चित्रपट निर्माता असून त्याचे या दोन ठिकाणांसह डोबिवली येथे प्रोजेक्ट सुरु आहे. त्यात गुंतवणुक केल्यास त्यांना चांगला फायदा होईल असे सांगितले होते. तिच्यावर विश्वास ठेवून त्यांनी अविनाशच्या वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्याला टप्यापटप्याने सुमारे 47 लाख रुपये दिले होते.

या गुंतवणुकीनंतर त्याने मृणालिनीला आतापर्यंत साडेचार लाख रुपये परत केले होते. मात्र नंतर त्याने व्याजाची रक्कम देणे बंद केले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने अविनाश जाधवला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने तिला प्रतिसाद दिला नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्याने पैसे देणार नाही, तुला काय करायचे आहे ते कर अशी धमकी दिली.

अशा प्रकारे अविनाश जाधव यांनी त्याच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परतावा देतो असे सांगून मृणालिनीसह वर्षा उसगावकर, तिचा भाऊ मंदार जांभळे आणि झीनत सय्यद यांची 47 लाखांची फसवणुक केली होती. या प्रकारानंतर तिने शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अविनाश जाधवविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच गुन्ह्यांत त्याला लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page