मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 मार्च 2026
मुंबई, – भरवेगात जाणार्या पाण्याच्या टँकरच्या धडकेने मोहम्मद अरफात आरिफ अन्सारी या 20 वर्षांच्या डिलीव्हरी बॉयचा मृत्यू झाल्याची घटना कांदिवलीतील चारकोप परिसरात घडली. या अपघाताला जबाबदार असलेल्या महेंद्र ग्यानसिंग यादव या टँकरचालकाविरुद्ध चारकोप पोलिसांनी हलगर्जीपणाचा गुन्हा नोंदविला आहे. मोहम्मद अरफातच्या अपघाती निधनाने त्याच्या मालवणीतील स्थानिक रहिवाशांसह पालकांमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे.
हा अपघात बुधवारी 4 मार्चला दुपारी सव्वाच्या सुमारास कांदिवलीतील भूमी मार्टजवळील बिल्ला बॉग स्कूलसमोरील रस्त्यावर झाला. अनस कासिम अन्सारी हा मूळचा उत्तरप्रदेशच्या बिजनौर, नगीनाचा रहिवाशी असून सध्या तो त्याच्या कुटुंबियांसोबत मालाडच्या मालवणी परिसरात राहतो. मृत मोहम्मद अराफत हा त्याच्या मामाचा मुलगा आहे. तीन वर्षापूर्वी तो मुंबई शहरात नोकरीसाठी आला होता. तेव्हापासून तो त्यांच्यासोबत मालवणीतील घरी राहत होता. तो सध्या झोमॉटोमध्ये डिलीव्हरी बॉयचे काम करत होता. बुधवारी सकाळी मोहम्मद अराफत हा नेहमीप्रमाणे कामावर निघून गेला होता.
दुपारी एक वाजता तो त्याच्या इलेक्ट्रीक बाईकवरुन डिलीव्हरीसाठी जात होता. दुपारी सव्वाच्या सुमारास तो बिल्ला बॉस स्कूलसमोरुन छत्रपती शिवाजी राजे कॉम्प्लेक्सच्या दिशेने जात होता. याच दरम्यान एका पाण्याच्या टँकरने त्याच्या बाईक्ला जोात धडक दिली होती. त्यात मोहम्मद अराफत हा गंभीररीत्या जखमी झाला होता. जखमी अवस्थेत त्याला तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच चारकोप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी अनस अन्सारी यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी टॅकर चालक महेंद्र यादव याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने टँकर चालवून मोहम्मद अराफतच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. महेंद्र हा बोरिवलीतील दत्तपाडा, टायरवाला गल्लीत राहत असून पाण्याच्या टँकरवर चालक म्हणून नोकरी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.