केवायसी अपडेटच्या नावाने वयोवृद्धाची पावणेदहा लाखांची फसवणुक
अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 मार्च 2026
मुंबई, – टाटा पॉवर इलेक्ट्रीसिटीमधून बोलत असल्याची बतावणी करुन अज्ञात व्यक्तीने केवायसी अपडेटसाठी पाठविलेली लिंक ओपन करणे एका वयोवृद्धाला चांगलेच महागात पडल्याची घटना बोरिवली परिसरात उघडकीस आली आहे. केवायसी अपडेटच्या नावाने या वयोवृद्धाची अज्ञात व्यक्तीने सुमारे पावणेदहा लाखांची ऑनलाईन फसवणुक केली आहे. याप्रकरणी बोरिवली पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून अज्ञात व्यक्तीचा शोध सुरु आहे.
69 वर्षांचे पोपटलाल गांडाभाई गेडिया हे त्यांच्या कुटुंबियांसोबत बोरिवली परिसरात राहतात. 24 फेब्रुवारीला ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन तो टाटा पॉवर इलेक्ट्रीसिटीमधून बोलत आहे. त्यांचे केवायसी अपडेट बाकी असून त्यांनी लवकर केवायसी अपडेट करावे. त्यासाठी त्याने त्यांना व्हॉटअपवर एक लिंक पाठविली होती. केवायसी अपडेट करणे त्यांना करता येत नव्हते. त्यामुळे संंबंधित व्यक्ती सांगत असलेल्या माहितीवरुन त्यांनी ती लिंक ओपन केली, त्यात त्यांची माहिती अपलोड केली.
शेवटी त्यांनी दहा रुपये युपीआयद्वारे ट्रान्स्फर केले होते. फॉर्म भरुन पूर्ण होताच समोरील व्यक्तीने फोन कट केला. हा प्रकार त्याने त्यांच्या एका मित्राला सांगितला. यावेळी या मित्राने त्यांना अशी कोणतीही लिंक ओपन करु नका, अशा फसवणुकीचे अनेक कॉल येत असून अनेकांची फसवणुक होत असल्याची माहिती सांगितले. या घटनेनंतर त्यांनी संबंधित व्यक्तीसोबत केलेले सर्व चॅट डिलीट केले होते. 3 मार्चला त्यांना बँकेतून काही मॅसेज प्राप्त झाले होते. या मॅसेजची पाहणी केल्यानंतर त्यांना त्यांच्या बँक खात्यात 9 लाख 75 हजार 955 रुपये डेबीट झाल्याचे दिसून आले. ते पाहून त्यांना धक्काच बसला होता.
केवायसी अपडेटच्या नावाने संबंधित अज्ञात व्यक्तीने त्यांना लिंक पाठवून त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार तिथे उपस्थित पोलिसांना सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा बोरिवली पोलीस ठाण्यातील सायबर सेलचे अधिकारी तपास करत आहेत. इलेक्ट्रीसिटीची केवायसी अपडेट करणे या वयोवृद्धाला चांगलेच महागात पडले होते.