मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
5 मार्च 2026
मुंबई, – खंडणीसाठी धमकीसह सावकारी कायद्यांच्या गुन्ह्यांत एका महिलेसह दोघांना मालवणी पोलिसांनी अटक केली. बिल्कीश रेहमत शेख ऊर्फ ज्योती आणि रेहमत विबाद शेख अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही नोटीस देऊन सोडून देण्यात आले. याच गुन्ह्यांत बिल्कीशच्या मुलाला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. ऐंशी हजाराच्या उसने पैशांवर तक्रारदार व्यावसायिकाने बिल्कीशला व्याजापोटी बारा लाख रुपये दिले होते, तरीही ती ऐंशी हजाराच्या मुद्दल रक्कमेसाठी त्यांना धमकी देत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या व्यावसायिकाने पोलिसांत तक्रार केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उजेडात आला होता.
39 वर्षांचे मुफ्फजेल अब्दुल हुसैन मंडल हे व्यावसायिक असून त्यांचा स्वतचा व्यवसाय आहे. सध्या ते मालाडच्या मालवणी, मार्वे रोडवर त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. बिल्कीश शेख ऊर्फ ज्योती ही त्यांच्या परिचित आहेत. जानेवारी 2019 साली त्यांना पैशांची गरज होती. त्यामुळे त्यांनी बिल्कीशकडे व्यवसायासाठी काही उसने पैशांची मागणी केली होती. तिने त्यांना ऐंशी हजार व्याजाने दिले होते. ठरल्याप्रमाणे ते तिला दरमहा वीस हजार रुपयांचे व्याज देत होते. जानेवारी 2019 ते डिसेंबर 2024 या कालावधीत त्यांनी तिला बारा लाख रुपये व्याज म्हणून दिले आहे. नंतर त्यांनी व्याजाची रक्कम देणे बंद केले होते.
याच कारणावरुन त्यांच्यात वाद सुरु होता. ती त्यांच्याकडे आणखीन पैशांची मागणी करत होते. मुद्दलचे ऐंशी हजार रुपये बाकी असे सांगून ती त्यांना सतत धमकी देत होती. मात्र त्यांनी तिला ऐंशी हजार रुपये देण्यास नकार दिला. ऐंशी हजारावर त्यांनी तिला आतापर्यंत बारा लाख रुपये दिले आहे. त्यामुळे ऐंशी हजार रुपये देण्याचा प्रश्नच येत नाही असे त्यांनी तिला स्पष्टपणे सांगितले होते. तरीही ती त्यांना सतत खंडणीसाठी धमकी देत होती. त्यांनी पैसे दिले नाहीतर परिणाम वाईट होतील असे सांगून त्यांना धमकावत होती.
बिल्कीशकडून सतत पैशांसाठी धमकी येत असल्याने त्यांनी घडलेला प्रकार मालवणी पोलिसांना सांगून तिच्यासह तिच्या मुलाविरुद्ध तक्रार केली हेती. या तक्रारीनंतर बिल्कीशसह तिघांविरुद्ध पोलिसांनी खंडणीसाठी धमकी देणे तसेच महाराष्ट्र सावकरी नियमन कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच बिल्कीश ऊर्फ ज्योती आणि रेमहत विबाद शेख या दोघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आले. या गुन्ह्यांत त्याच्या मुलाला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून या गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक काळे हे करत आहेत.