पुर्नविकासात गेलेले हॉटेल भाड्याने देण्याची बतावणी करुन फसवणुक

डिपॉझिटच्या दहा लाखांचा अपहारप्रकरणी हॉटेलमालकावर गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 मार्च 2026
मुंबई, – पुर्नविकासात गेलेले हॉटेल भाड्याने देण्याची बतावणी करुन एका हॉटेल व्यावसायिकाची सुमारे दहा लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार मरिनड्राईव्ह परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्रीकांत नंदकिशोर थोरात या आरोपी हॉटेलमालकाविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हॉटेलची जागा पुर्नविकासात गेल्याची माहिती असताना श्रीकांतने तक्रारदार व्यावसायिकासोबत पाच वर्षांसाठी भाड्याने हॉटेल देण्याचा करार करुन त्यांच्याकडून डिपॉझिट म्हणून दहा लाख घेऊन फसवणुक केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

उदयकुमार विठ्ठल शेट्टी हे हॉटेल व्यावसायिक असून ते सायन परिसरात राहतात. त्यांचा अंधेरी येथे एक बार अ‍ॅण्ड रेस्ट्रॉरंट असून त्यात त्यांचा भाऊ विजय शेट्टी हा पार्टनर आहे. त्यांना त्यांचा हॉटेलचा व्यवसाय वाढवायचा होता, त्यासाठी ते आणखीन एक-दोन हॉटेल भाड्याने चालविण्याचा विचार करत होते. याच दरम्यान त्यांना एका वर्तमानपत्रात मरिनड्राईव्ह येथील ठाकूरद्वार येथील झावबावाडी, कोलंबो चायनीज या चायनीस आणि पंजाबी हॉटेलची एक जाहिरात दिसली होती. त्यात हॉटेलमालक श्रीकांत थोरात याचा मोबाईल क्रमांक होता. त्याला त्याचे हॉटेल भाडेतत्त्वावर द्यायचे होते. त्यामुळे त्यांनी श्रीकांतला मोबाईलवर संपर्क साधला होता. यावेळी त्यांनी ते हॉटेल भाड्याने घेण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले.

याबाबत सविस्तर बोलणीसाठी त्याने त्यांना चर्नीरोड येथील स. का. पाटील उद्यानाजवळ बोलाविले होते. ठरल्याप्रमाणे उदयकुमार शेट्टी हे त्यांचा मित्र सतीश जया शेट्टी यांच्यासोबत तिथे गेले होते. तिथेच त्यांची श्रीकांत थोरातची भेट झाली होती. यावेळी त्यांच्यात हॉटेल भाड्याने देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली होती. त्यात श्रीकांत त्यांना पाच वर्षांसाठी त्यांचे हॉटेल चालविण्यासाठी देणार होते. त्यासाठी त्यांना दहा लाख रुपयांचे डिपॉझिट आणि 65 हजार महिना भाडे देण्याचे ठरले होते. ठरल्याप्रमाणे उदयकुमारने त्यांना चार लाख रुपये कॅश तर सहा लाख रुपये ऑनलाईन पाठविले होते.

या पेमेंटनंतर श्रीकांतने हॉटेलचे नूतनीकरण करुन सात ते आठ दिवसांत हॉटेलचा ताबा देतो असे सांगितले. काही दिवस उलटूनही श्रीकांतचा कॉल आला नाही म्हणून त्यांनी त्याला कॉल केला होता, यावेळी त्याने तो मुंबईबाहेर असल्याचे सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार संशयास्पद वाटताच ते हॉटेलजवळ गेले होते. यावेळी त्यांना तिथे हॉटेल दिसले नाही. या ठिकाणी पुर्नविकासाचे काम सुरु होणार असल्याने बिल्डरकडून ते हॉटेल पाडण्यात आल्याचे सांगण्यात आले. पुर्नविकासाबाबत श्रीकांतने त्यांना काहीच माहिती दिली नव्हती. ती जागा पुर्नविकासासाठी जाणार होती ही माहिती असूनही श्रीकांतने त्यांच्यासोबत हॉटेलचा पाच वर्षांचा भाडेकरार केला होता. त्यांच्याकडून डिपॉझिट म्हणून दहा लाख रुपये घेतले.

फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी श्रीकांतकडून पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र वांरवार कॉल करुनही त्याने त्यांना दहा लाख रुपये परत केले नाही. श्रीकांतकडून फसवणुक झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी एल. टी मार्ग पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे श्रीकांत थोरातविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. त्याने त्याच्या हॉटेलचे इतर काही लोकांशी भाडेकरार करुन त्यांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page