40 लाखांच्या एमडी ड्रग्जसहीत 33 वर्षांच्या आरोपीस अटक
विक्री करण्यापूर्वीच 800 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
6 मार्च 2026
मुंबई, – सुमारे 40 लाखांच्या एमडी ड्रग्जसहीत फौजानअली अहमद तिकिटवाला या 33 वर्षांच्या आरोपीस डी. एन नगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. त्याला जुनैद नावाच्या आरोपीने 800 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज विक्रीसाठी दिले होते, मात्र ड्रग्जची विक्री करण्यापूर्वीच त्याला पोलिसांनी अटक केली. फौजानअलीविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने मंगळवार 10 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत जुनैद याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या दोघांनी आतापर्यंत अनेकदा एमडी ड्रग्जची विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
जोगेश्वरी येथे फौजानअली हा राहत असून त्याने त्याच्या राहत्या घरी मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्जचा साठा ठेवला आहे. या ड्रग्जची तो लवकरच विक्री करणार आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनीत घाडगे यांना मिळाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मचिंदर यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक गितांजली बाबर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनीत घाडगे, पोलीस हवालदार संजय हळदे, बिपीन गायकवाड, विनोद गायकवाड, मंगेश चव्हाण, रांजणे, पोलीस शिपाई बाबर, पांढरे, प्रधान, पोलीस शिपाई चंद्रकला गारे आदी पथकाने गुरुवारी सायंकाळी फौजानअलीच्या जोगेश्वरीतील एस. व्ही. रोड मेमन कॉलनीतील दुसर्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 21 मध्ये छापा टाकला होता.
फ्लॅटची झडतीदरम्यान या पथकाला 800 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. त्याची किंमत सुमारे 40 लाख रुपये इतकी आहे. तपासात फौजानअलीने त्याला ते एमडी ड्रग्ज जुनैद नावाच्या आरोपीने दिले होते. त्याची तो लवकरच विक्री करणार होता. जुनैदने त्याला यापूर्वीही ड्रग्ज विक्रीसाठी दिले होते. ते दोघेही मागणीनुसार ड्रग्ज तस्करांना एमडी ड्रग्जचा पुरवठा करत होते. ड्रग्ज विक्रीतून आलेली रक्कम फौजानअली हा जुनैदला देत होता. त्यासाठी तो त्याला ठराविक रक्कम कमिशन म्हणून देत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
फोजानअली हा फ्लॅट 21 मध्ये एकटाच राहत असून त्याला दोन बहिणी आहेत. त्या दोघींचे लग्न झाले असून त्यांच्या पतीसोबत राहतात. त्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून तो काहीच कामधंदा करत नव्हता. दोन वर्षांपूर्वी त्याने त्याचा मित्र जुनैदसोबत झटपट श्रीमंत होण्यासाठी ड्रग्ज तस्करीचा धंदा सुरु केला होता. या दोन वर्षांत त्यांनी लाखो रुपयांच्या ड्रग्जची विक्री केल्याचे सांगितले. तपासात आलेल्या या माहितीनंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
याच गुन्ह्यांत रात्री उशिरा फौजानअलीला पोलिसांनी अटक केली तर जुनैदचा पोलीस शोध घेत आहेत. अटकेनंतर त्याला शुक्रवारी दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून येणार्या माहितीनंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनीत घाडगे यांनी सांगितले.