वडिलांशी लग्न करणार्‍या सावत्र आईच्या डोक्यात जीमची प्लेट मारली

हल्ल्यानंतर पळून गेलेल्या सावत्र मुलाला अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
9 मार्च 2026
मुंबई, – वडिलांशी दुसरे लग्न केले म्हणून काही महिन्यांपासून सुरु असलेल्या वादातून एका 25 वर्षांच्या तरुणाने फातिमा मोहम्मद साकीर अन्सारी या 32 वर्षांच्या सावत्र आईच्या डोक्यात जीमची प्लेट मारुन दुखापत करुन पलायन केले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपी मुलाला अखेर बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. अब्दुल रेहमान साबीर अन्सारी असे या आरोपी मुलाचे नाव असून याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसर्‍या लग्नावरुन फातिमा आणि अब्दुल रेहमान यांच्यात काही महिन्यांपासून वाद सुरु होता, याच वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही घटना मंगळवार 3 मार्चला सकाळी सव्वाअकरा वाजता गोरेगाव येथील लिंक रोड, शहिद भगतसिंग नगर, तयब्बा मशिदीजवळील अन्वर चाळीत घडली. याच चाळीतील रुम क्रमांक 673 मध्ये फातिमा ही तिचा दुसरा पती मोहम्मद साकीर आणि चार मुलांसोबत राहते. चार वर्षांपूर्वी तिचे मोहम्मद साकीरसोबत विवाह झाला होता. तिच्या पतीला पहिल्या पत्नीपासून चार मुले असून त्यातील आरोपी अब्दुल रेहमान हा त्याचा मोठा मुलगा आहे. या दोघांच्या विवाहामुळे अब्दुल रेहमानला तिच्याविषयी प्रचंड राग होता. त्याला या दोघांचे लग्न मंजूर नव्हते. त्यातून त्यांच्यात अनेकदा खटके उडत होते.

27 फेब्रुवारी 2026 रोजी फातिमा आणि अब्दुल रेहमान यांच्यात प्रचंड वाद झाला होता, मात्र नातेवाईकांनी मध्यस्थी करुन त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. 3 मार्चला फातिमाची प्रकृती ठिक नव्हती. त्यामुळे ती तिच्या दोन्ही मुलांसोबत घरी होती तर तिचा पती मोहम्मद साकीर हा कामावर निघून गेला होता. सकाळी सव्वाअकरा वाजता तिथे अब्दुल रेहमान आला आणि त्याने जुन्या वादातून तिच्याशी भांडण सुरु केले होते. तो तिला सतत शिवीगाळ करत असल्याने तिने त्याला शिवीगाळ करु नकोस तसेच तिच्या घरी का आला आहेस याबाबत जाब विचारला होता.

त्याचा राग आल्याने त्याने तिच्या डोक्यात जिमची वजनदार प्लेट मारली. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. या हल्ल्यानंतर अब्दुल रेहमान तेथून पळून गेला. स्थानिक रहिवाशांना हा प्रकार समजताच त्यांनी तिला तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे प्राथमिक औषधोपचार केल्यानंतर तिने बांगुरनगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिचा सावत्र मुलगा अब्दुल रेहमानविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा घडल्यानंतर अब्दुल रेहमान हा पळून गेला होता. त्यामुळे त्याचा पोलिसांकडून शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना त्याला शनिवारी 7 मार्चला बांगुरनगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने गोरेगाव येथून अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page