सोन्याच्या गुंतवणुकीच्या बहाण्याने 2.35 कोटींची फसवणुक

मुख्य आरोपी महिलेसह चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
9 मार्च 2026
मुंबई, – सोन्याच्या गुंतवणुकीवर चांगला परवाता देण्याच्या बहाण्याने एका महिलेसह तिच्या कुटुंबियांची, नातेवाईक आणि मित्रांची चारजणांच्या टोळीने 2 कोटी 35 लाख रुपयांची फसवणुक केल्याचा प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी महिलेसह चौघांविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सोनल मेपा रबारी, तिचा पती मेपा रबारी, भाचा जयदेव रबारी आणि मदतनीस रमेश भानुशाली अशी या चौघांची नावे आहेत. चारही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या चौघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतरांची फसवणुक केल्याचे बोलले जात असून फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भारती भरत भानुशाली ही 34 वर्षांची महिला घाटकोपर येथील होमगार्ड केंद्राजवळील नर्मदा बालासाहेब सहकारी सोसायटीमध्ये राहते. तिचे पती भरत न्हावाशेवा येथे नोकरी करतात तर सासरे पुरुषोत्तम यांचा सांताक्रुज येथे किराणा दुकान आहे. जानेवारी 2023 रोजी तिची सोनल आणि रमेशशी ओळख झाली होती. यावेळी सोनलने रमेशसह त्याचे कुटुंबिय तिच्याकडून स्वस्तात सोने घेत असून त्यात त्यांना चांगला फायदा झाला आहे. त्यामुळे तिने त्यांना सोन्याबाबत विचारणा केली होती. यावेळी त्यांनी तिला सोन्याची एक स्किम असून त्यात गुंतवणुक केल्यास तिला चांगला फायदा होईल असे सांगितले.

एक तोळ्यामध्ये पाच ते सात हजार रुपये प्रॉफिट होत असल्याने तिनेही सोनलकडून स्वस्तात सोने खरेदीच्या स्किममध्ये गुंतवणुक करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तिच्यासह तिच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्याकडे सोन्याच्या स्किमममध्ये गुंतवणुक केली होती. इतर नव्हे तर तिने तिच्या परिचित नातेवाईक आणि मित्रांनाही तिच्याकडे गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. महिन्याला सोन्याचा भाव वाढत असल्याने सोनल, तिचा पती मेपा, भाचा जयदेव आणि मदतनीस म्हणून करणारा रमेशने त्यांना सोन्यामध्ये आणखीन गुंतवणुक करण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात गुंतवणुक केली होती.

जानेवारी 2023 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत भारतीसह तिच्या कुटुंबियांनी, नातेवाईक आणि मित्रांनी त्यांच्याकडे 2 कोटी 35 लाख रुपयांच्या 24 कॅरेट सोन्यावर गुंतवणुक केली होती. ही रक्कम तिला कॅश आणि ऑनलाईन पाठविण्यात आली होती. मात्र त्यांनी तिला गुंतवणुक केलेले सोने आणि परताव्याची रक्कम दिली नाही. वारंवार विचारणा करुनही सोनल तिला टाळण्याचा प्रयत्न करत होते. काही दिवसांनी तिने तिची प्रकृती बिघडल्याने तिच्या गुजरात येथील कच्छच्या गावी आल्याचे सांगितले.

नंतर तिने तिचा मोबाईल बंद केला होता. तिच्या घाटकोपरच्या फ्लॅटला कुलूप होता. आजूबाजूच्या रहिवाशांकडे सोनलची चौकशी केली असता त्यांना तिच्याविषयी काहीच माहिती नव्हती. त्यामुळे भारती ही तिच्या कच्छ येथील गावी गेली होती, मात्र ती तिथेही नव्हती. सोन्याच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून सोनसह इतर तिघांनी तिच्यासह तिच्या कुटुंबियांची, नातेवाईक आणि मित्रांची 2 कोटी 35 लाख रुपयांची फसवणुक केली होती.

हा प्रकार लक्षात येताच तिने घाटकोपर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर सोनल रबारी, तिचा पती मेपा रबारी, भाचा जयदेव रबारी आणि त्यांना मदत करणारा रमेश भानुशाली या चौघांविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. चारही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page