सहकारी समजून 24 वर्षांच्या तरुणाला तिघांनी बेदम चोपले

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल तर पळून गेलेल्या दोघांना अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
9 मार्च 2026
मुंबई, – भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या विकास राजेंद्र सोनार नावाच्या एका 24 वर्षांच्या तरुणाला पळून गेलेल्या तरुणाचा सहकारी समजून तीन तरुणांनी बेदम हाताने, लाथ्याबुक्यांनी तसेच हातातील कड्ड्याने चोपल्याची घटना कांदिवली परिसरात घडली. याप्रकरणी तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या दोघांना कांदिवली पोलिसांनी अटक केली. विनायक मारुती मोरे आणि युवराज संदीप ताजणे अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. या गुन्ह्यांत आदर्श गुप्ता नावाचा एक तरुण फरार असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. भांडणात मध्यस्थी करणे विकास सोनार या तरुणाला चांगलेच महागात पडले.

विकास हा कांदिवलीतील इराणीवाडी, जिवोदन चाळीत राहत असून एसी रिपेरिंगचे काम करतो. 26 फेब्रुवारीला जेवण करुन तो घरातील पोटमाळ्यावर झोपण्यासाठी गेला होता. रात्री अडीच वाजता त्याला भांडणाचा आवाज आला होता, त्यामुळे तो झोपेतून उठून खाली आला. यावेळी त्याला तिथे युवराज, मारुती आणि आदर्श गुप्ता हे तिघेही एका तरुणाला बेदम मारहाण करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याने त्यांच्यातील मिटविण्याचा प्रयत्न केला.

यावेळी मारहाण खाणारा तरुण अंधाराचा फायदा घेऊन गेला. तो पळून गेल्यानंतर या तिघांना विकास त्याचा सहकारी असल्याचे वाटले. त्याच्या मध्यस्थीमुळे तो पळून गेला, त्याने त्याला पळून जाण्यास मदत केली म्हणून या तिघांनी विकासला शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली होती. हाताने, लाथ्याबुक्यांनी तसेच हातातील कड्ड्याने झालेल्या मारहाणीत तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला स्थानिक रहिवाशांनी तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

तिथे प्राथमिक औषधोपचार केल्यानंतर त्याने घडलेला प्रकार कांदिवली पोलिसांना सांगितला. त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी विनायक मोरे, युवराज ताजणे आणि आदर्श गुप्ता या तिघांविरुद्ध भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या विनायक मोरे आणि युवराज ताजणे या दोघांना पोलिसांनी अटक केली तर पळून गेलेल्या आदर्श गुप्ताचा पोलीस शोध घेत आहेत. पळून गेलेल्या तरुणाचा सहकारी समजून विकासला या तिघांनी बेदम मारहाण केल्याने तपासात उघडकीस आले आहे. भांडणात मध्यस्थी करणे विकासला चांगलेच महागात पडले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page