मेडीकलमध्ये प्रवेश देण्याच्या आमिषाने तीस लाखांची फसवणुक
पती-पत्नीसह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
11 मार्च 2026
मुंबई, – पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात असलेल्या डॉ. डी. वाय पाटील मेडीकल कॉलेजमध्ये एमबीबीएससाठी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश देण्याच्या आमिषाने एका जोडप्याने त्यांच्या सहकार्याच्या मदतीने दोन व्यक्तींची सुमारे तीस लाखांची फसवणुक केल्याची घटना मुलुंड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी पती-पत्नीसह तिघांविरुद्ध नवघर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. लक्ष्मण भोसले, प्रांजली लक्ष्मण भोसले आणि केतन दत्तात्रय खजिनदार अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांना लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे.
पंकज पोपटराव भोसले हे मूळचे सातारा येथील कोरेगावचे रहिवाशी असून व्यवसायाने हॉटेल व्यावसायिक आहेत. त्यांचा ओमप्रकाश देवानंद भोसले हा चुलत भाऊ असून तोदेखील कोरेगाव परिसरात राहतो. त्याचा मुलगा शार्दुल हा 2024 साली बारावी सायन्स उत्तीर्ण झाला होता. त्याला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे होते, त्यासाठी त्याने नीटची परिक्षा दिली होती. मात्र या परिक्षेत त्याला कमी मार्क्स मिळाले होते. त्यामुळे भोसले कुटुंबियांनी मॅनेजमेंट कोट्यातून एमबीबीएससाठी प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान त्यांचा मित्र केतनने त्यांची ओळख लक्ष्मण भोसले व त्याची पत्नी प्रांजली भोसलेशी करुन दिली होती. ते दोघेही मूळचे अहमदनगरचे रहिवाशी होते. प्रांजली ही मुंबई महानगरपालिकेत शिक्षण अधिकारी असल्याचे सांगून तीच शार्दुलला मेडीकलमध्ये प्रवेश मिळवून देईल असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला होता.
याच दरम्यान केतन आणि पंकज भोसले हे दोघेही लक्ष्मण भोसले याच्या मुलुंड येथील हरिओमनगर, मिलेनियम पार्क अपार्टमेंटमधील घरी भेटले होते. यावेळी त्याने शार्दुलला पुण्यातील पिंपरी-चिंचवडच्या डॉ. डी. वाय पाटील मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्यांना 1 कोटी 20 लाख रुपये आगाऊ रक्कम जमा करावी लागेल असे सांगून अॅडव्हान्स म्हणून त्यांच्याकडे दहा लाखांची मागणी केली. त्यामुळे पंकज भोसले यांचा भाऊ ओमप्रकाशने प्रांजलीच्या बँक खात्यात दहा लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. ही रक्कम ट्रान्स्फर केल्यानंतर काही दिवसांत शार्दुलला प्रवेश मिळेल असे सांगण्यात आले. मात्र तिने त्याला प्रवेश मिळवून दिला नाही. विचारणा केल्यानंतर प्रांजली ही दिल्लीत असल्याचे सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होती.
डिसेंबर 2024 पर्यंत तिने तिचा शब्द पाळला नाही, त्यामुळे त्यांनी तिच्याकडे प्रवेशासाठी दिलेल्या दहा लाखांची मागणी सुरु केली होती. मात्र तिने पैसे परत करण्यास स्पष्टपणे नकार दिला. याच दरम्यान त्यांना वेगवेगळ्या व्यक्तींनी फोन करुन त्यांचे पैसे मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रांजलीने त्यांना पैसे परत केले नाही. काही दिवसांनी पंकज भोसले यांना सुरज शरन परदेशी नावाच्या एका व्यक्तीला अशाच प्रकारे लक्ष्मण आणि प्रांजलीने वीस लाखांना गंडा घातल्याची माहिती समजली होती. त्यांच्या मुलाला मेडीकलमध्ये प्रवेश देते असे सांगून त्यांनी सुरज परदेशी यांच्याकडून वीस लाख रुपये घेतले आणि मुलाला प्रवेश मिळवून दिला नाही.
पैशांची मागणी केल्यानंतर त्यांनी त्यांनाही पैसे परत करणार नाही अशी धमकी दिली होती. अशा प्रकारे या पती-पत्नीने ओमप्रकाश भोसले आणि सुरज परदेशी यांची तीस लाखांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच पंकज भोसले यांनी नवघर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथे त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर लक्ष्मण भोसले, प्रांजली भोसले आणि केतन खजिनदार या तिघांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. भोसले पती-पत्नीने अशाच प्रकारे इतर काही फसवणुकीचे गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.