दोन वेगवेगळ्या अपघातात अल्पवयीन मुलासह तिघांचा मृत्यू

विक्रोळी व आरे पोलिसांकडून दोन स्वतंत्र अपघाताची नोंद

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
11 मार्च 2026
मुंबई, – शहरात दोन वेगवेगळ्या अपघाताच्या घटनेत एका सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलासह तिघांचा मृत्यू झाला तर एक तरुण गंभीररीत्या जखमी झाला. गुलशन यादव असे या जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये गोविंद कदम, राज अर्जुन कहार व प्रविण मुन्नालाल यादव यांचा समावेश आहे. याप्रकरणी विक्रोळी आणि आरे पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद केली आहे.

पहिला अपघात मंगळवारी दुपारी पावणेचार वाजता विक्रोळीतील पाचखड्डा, पूर्व दुतगती महामार्ग, ठाण्याच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यावर झाला. अमीत बळीराम पवार हे जोगेश्वरी येथे राहत असून एका खाजगी कंपनीत इलेक्ट्रीक इंजिनिअर म्हणून कामाला आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजता ते कामानिमित्त त्यांच्या बाईकवरुन पूर्व दुतगती महामार्ग, ठाण्याच्या दिशेने जाणार्‍या पाचखड्ड्याच्या दिशेने जात होते. यावेळी मागून आलेल्या एका बाईकस्वाराने जोरात धडक दिली होती. त्यामुळे ते बाईकवरुन खाली पडले होते तर आरोपी बाईकस्वाराने तेथील एका झाडाला जोरात धडक दिली. या बाईकवर तीन तरुण होते.

अपघातानंतर त्यांनी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला ही माहिती दिली. ही माहिती प्राप्त होताच विक्रोळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अपघातात जखमी झालेल्या तिन्ही तरुणांना तातडीने मुलुंडच्या वीर सावरकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे प्रविण मुन्नालाल यादव आणि राज अर्जुन कहार या दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले तर गुलशन यादव याला पुढील चौकशीसाठी सायन हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले होते.

अपघातात तो गंभीररीत्या जखमी झाला असून तिथेच त्याच्यावर उपचार सुरु आहे. जखमी आणि मृत तिन्ही तरुण भांडुपचे रहिवाशी आहेत. याप्रकरणी अमीत बळीराम पवार यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यांच्या जबानीनंतर पोलिसांनी आरोपी बाईकस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. भरवेगात बाईक चालविण्याच्या नादात हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.

दुसर्‍या अपघातात गोविंद कदम यांचा मृत्यू झाला. गोरेगाव येथील आरे कॉलनी, साईबाबा मंदिराजवळील ओल्ड हिल क्वार्टर्समध्ये मयुर गोविंद कदम हा राहत असून मृत गोविंद कदम हे त्याचे वडिल आहेत. त्यांचा श्री सेल्स नावाची प्लास्टिक सिल उत्पादन कंपनी असून या कंपनीचे कार्यालय कामा इस्टेट परिसरात आहे. शुक्रवारी 6 मार्चला सकाळी सव्वानऊ वाजता ते घरातून कंपनीत जाण्यासाठी त्यांच्या अ‍ॅक्टिव्हा बाईकवरुन निघाले होते. ही बाईक दिनकरराव देसाई मार्ग, आरे कॉलनी युनिट दोनकडे जाणार्‍या रस्त्यावरुन जात होती. यावेळी समोरुन भरवेगात जाणार्‍या एका कारने त्यांच्या अ‍ॅक्टिव्हा बाईकला धडक दिली.

या अपघातात ते बाईकवरुन स्लिप होऊन खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्यांना तातडीने जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच आरे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी मयुर कदम याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कारचालक शामराव पाटील याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने कार चालवून गोविंद कदम यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page