लिफ्टमधील अश्लील व्हिडीओ व्हायरल करुन महिलेची बदनामी
सोसायटीच्या अध्यक्षाच्या 25 वर्षांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
11 मार्च 2026
मुंबई, – लिफ्टमध्ये असताना एका अज्ञात व्यक्तीसोबत भावनेच्या भरात केलेल्या किसचा अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करुन एका विवाहीत महिलेची बदनामी झाल्याचा धक्कादायक प्रकार साकिनाका परिसरात उघडकीस आला आहे. हा व्हिडीओ महिला राहत असलेल्या इमारतीच्या अध्यक्षाच्या 25 वर्षांच्या मुलाने व्हायरल केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आरोपी तरुणाविरुद्ध साकिनाका पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्याने या महिलेची समाजात प्रचंड बदनामी झाल्याचे बोलले जाते.
36 वर्षांची तक्रारदार महिला ही तिच्या पती आणि दोन मुलीसोबत साकिनाका परिसरात राहते. तिचे पती गोरेगाव येथे कारपेंटर म्हणून कामाला आहे. जानेवारी 2026 रोजी ती तिच्या इमारतीच्या लिफ्टमधून जात होती. यावेळी तिच्यासोबत एक अज्ञात व्यक्ती होता. या दोघांनी एकमेकांकडे पाहिले. लिफ्टमध्ये असताना त्यांनी भावनेच्या भरात एकमेकांना किस केले होते. त्यानंतर तो तेथून निघून गेला. 9 मार्चला सायंकाळी सहा वाजता ही महिला संघर्षनगर येथील भाजी मार्केटमध्ये सामान आणण्यासाठी गेली होती.
यावेळी काहीजण इसका व्हिडीओ बहोत व्हायरल हो रहा है असे बोलत होते. त्यामुळे तिने मागू वळून पाहिले असता तीन ते चार महिला एकमेकांसोबत बोलत होत्या. तिथे त्यांच्या परिचित एक मुलगा होता. त्यामुळे तिने त्याच्याकडे व्हिडीओबाबत विचारणा केली. यावेळी त्याने तिचा अज्ञात व्यक्तीसोबत किस करताना एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असल्याचे सांगितले. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तिला धक्काच बसला होता.
त्यांच्या सोसायटीच्या अध्यक्षाकडे संपूर्ण इमारतीच्या सीसीटिव्ही कॅमेर्याचा बँकअप असतो. त्यांना तंत्रज्ञानाची माहिती नसल्याने पूर्ण इमारतीमध्ये कॅमेरा तपासाचे काम त्यांचा मुलगा रवी हा करत होता. त्यानेच तिचा अज्ञात व्यक्तीसोबत किस करताना व्हिडीओ काढून तो व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करुन तिची बदनामी केली होती.
हा प्रकार लक्षात येताच तिने साकिनाका पोलिसांत रवीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी रवीविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून आरोपीची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.