इमारतीच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेची फसवणुक

1.30 कोटीच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस अटक

0

अरुण सावरटकर
11 मार्च 2026
मुंबई, – वांद्रे येथे सुरु असलेल्या इमारतीच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुक केल्यास फ्लॅट, पंधरा महिन्यांत फ्लॅट न दिल्यास दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून एका 55 वर्षीय पोलिओ पेंशट असलेल्या महिलेची फसवणुक कटातील एका वॉण्टेड आरोपीस वांद्रे पोलिसांनी अटक केली. फहीद मेहमूद कादरी असे या आरोपी आरोपीचे नाव असून गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. अडीच वर्षांपासून फरार असलेल्या फहीदला अटक करण्यात पोलिसांना यश आले. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसाकडून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत फहीदसोबत बिल्कीस कादरी, मेहमूद कादरी हे सहआरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

यास्मिन अब्दुल सौदागर ही तिच्या कुटुंबियांसोबत महिला माहीमच्या एल. जी रोडच्या एका निवासी अपार्टमेंटमध्ये राहते. तिचे पती खलील हे टुर्स व्यावसायिक आहेत तर भाऊ अशफाक सौदागर याचा महागड्या कार खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. यास्मिन ही पोलिओ पेंशट असल्याने तिला लहानपणापासून चालता येत नाही. चालताना तिला प्रचंड त्रास होतो. 2016 साली अशफाकने तिला फहीदसह मेहमूद कादरीविषयी माहिती देताना ते वांद्रे येथे राहतात. ते बिल्डर असून त्यांचा काही इमारतीचे प्रोजेक्ट सुरु असल्याचे सांगितले होते.

वांद्रे येथील पेरी क्रॉस रोडवर त्यांच्या एका इमारतीचे बांधकाम सुरु असून त्यांना मनपाकडून दोन मजली इमारतीचे बांधकाम करण्याची परवानगी दिली आहे. त्यांना त्यांचा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे तिने त्यांच्या प्रोजेक्टमध्ये एक कोटी तीस लाख रुपयांची गुंतवणुक केल्यास तिला चांगला परतावा किंवा त्यांच्या इमारतीमध्ये 1050 स्वेअर फिट फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. अशफाकवर विश्वास ठेवून तिने कादरींना 50 लाख रुपये कॅश स्वरुपात तर 50 लाख रुपयांचा एक धनादेश दिला होता. उर्वरित तीस लाखांची कॅश नंतर तिने त्यांना पाठविली होती.

ठरल्याप्रमाणे तिने त्यांच्या प्रोजेक्टमध्ये कादरींना एक कोटी तीस लाख रुपये दिले होते. त्यानंतर त्यांच्या फ्लॅट खरेदी-विक्रीचा एक करार झाला होता. त्यात तिला सहाव्या मजल्यावर 601 क्रमांकाचा फ्लॅट, जून 2020 ते सप्टेंबर 2021 या पंधरा महिन्यांत फ्लॅटचा ताबा देण्याचे तसेच फ्लॅटचा ताबा दिला नाहीतर तिला 2 कोटी 60 लाख रुपये देण्याचे करारात नमूद करण्यात आले होते. मात्र ही रक्कम घेतल्यानंतर त्यांनी इमारतीचे बांधकाम पूर्ण केले नाही. सप्टेंबर 2021 पर्यंत तिला फ्लॅटचा ताबा मिळणार होता, मात्र ऑक्टोंबर 2023 पर्यंत तिला फ्लॅटचा ताबा देण्यात आला नाही. त्यामुळे तिने त्यांच्याकडे करारात नमूद केल्याप्रमाणे 2 कोटी 60 लाखांची मागणी सुरु केली होती.

मात्र त्याने तिला फ्लॅचा ताबा दिला नाही किंवा गुंतवणुक केलेली रक्कम परत केली नाही. फहीदने बिल्कीस कादरी आणि मेहमूद कादरी यांच्या मदतीने कट रचून यास्मिन सौदागर हिला इमारतीच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन तिच्याकडून घेतलेल्या एक कोटी तीस लाखांचा अपहार करुन फसवणुक केली होती. त्यामुळे तिने या तिघांविरुद्ध वांद्रे पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्ध कट रचून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपी पळून गेले होते. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. याच गुन्ह्यांत फहीद हा गेल्या अडीच वर्षांपासून वॉण्टेड होता, अखेर त्याला वांद्रे पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही लोकांना फ्लॅट देण्याचे, इमारतीच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुक केल्यास परतावा देण्याचे आमिष दाखवून गंडा घातला आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page